Reservation of Panchayat Samiti Chairman in Pune district declared : पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव आणि हवेली पंचायत समितीचे सभापतीपद 'खुले'!

पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर : इंदापूर अनुसुचित जाती व जुन्नरचे अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

Reservation of Panchayat Samiti Chairman in Pune district declared : पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव आणि हवेली पंचायत समितीचे सभापतीपद 'खुले'!
पुणे:- पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षण सोडतीची चिठ्ठी काढताना लोणीकंद जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व उपजिल्हाधिकारी डॉ. चारूशीला देशमुख-मोहिते व अन्य अधिकारी..

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ९  ऑक्टोबर २०२५ :- तब्बल पावणेचार वर्षांच्या खंडानंतर अखेर गुरुवारी (दि.९ ऑक्टोबर) पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव आणि हवेली या तीन पंचायत समित्यांचे सभापतीपद हे खुले (सर्वसाधारण गट) झाले असून इंदापूरचे सभापतीपद अनुसुचित जाती (एस.सी.) तर, जुन्नर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ सभापती पदे ही विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहेत. यापैकी एक पद अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी, दोन पदे ही नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी ) महिलांसाठी आणि चार पदे ही खुल्या गटातील (सर्वसाधारण) महिलांसाठी राखीव झाली आहेत. 

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत गुरुवारी पुणे दि तेरा पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या समन्वयक व उपजिल्हाधिकारी डॉ. चारूशीला मोहिते -देशमुख, पुणे जिल्हा निवडणूक शाखेचे तहसीलदार राहूल सारंग, कुळ कायदा शाखेचे तहसीलदार जगदीश निंबाळकर आदी उपस्थित होते. 

प्रारंभी कायद्यातील तरतुदीनुसार अनुसुचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचित जमाती (एस.टी.) या दोन प्रवर्गाचे सभापती पद हे लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे निश्चित करण्यात आले. यानुसार या दोन्ही प्रवर्गातील आरक्षणासाठी त्या त्या प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या विचारात घेण्यात आली. 

पुणे जिल्ह्यात एकूण तेरा पंचायत समित्या आहेत. या सर्व पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल हा दि. २० मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत सुमारे पावणेचार वर्षांपासून या संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. एवढ्या प्रदीर्घ कालखंडानतर आज (गुरुवारी) हे आरक्षण काढण्यात आले आहे .पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर, हवेली आणि राजगुरुनगर या पंचायत समित्यांचा समावेश आहे. 

या आरक्षण सोडतीसाठी हवेली तालुक्यातील पीएम. श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद येथील इयत्ता चौथी व पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये गायत्री लष्करे, प्रणिता बारगीर, अनुजा चव्हाण, सोहम गावंडे व  आर्य गुंजाळ यांचा समावेश होता. यावेळी या शाळेच्या मुख्याध्यापिका जानकी अनुले, सहशिक्षक अनिल नरवाडे आणि एकनाथ शिंदे आदी या विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. 

पंचायत समिती सभापतींचे प्रवर्गनिहाय आरक्षण 

-  इंदापूर --- अनुसुचित जाती (एस.सी.) 

-  जुन्नर --- अनुसुचित जमाती (महिला) 

-  पुरंदर व दौंड --- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 

-  शिरूर व मावळ --- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).

-  खुला गट (सर्वसाधारण) --- बारामती, आंबेगाव आणि हवेली. 

-  खुला गट (महिला) --- भोर, वेल्हे, मुळशी आणि खेड.

कोणत्या  प्रवर्गासाठी किती सभापतीपदे 

- अनुसुचित जाती  (एस.सी.) --- ०१.

- अनुसुचित जमाती (एस.टी.) --- ०१ (महिला) 

- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) --- ०४ पैकी दोन महिला.

- खुला गट (सर्वसाधारण) ---- ०७ पैकी ०४ महिला.