Santosh saruk research : भारतातील पाच वर्षांखालील बालकांच्या पोषणस्थितीवर बीड जिल्ह्यातील संतोष सारुक यांचे सखोल संशोधन!
या संशोधनामुळे संतोष सारुक यांना बायोस्टॅटिस्टिक्स विषयात पीएच.डी.पदवी प्रदान
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २१ ऑगस्ट २०२६ :- मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सारुकवाडी (ता. केज) येथील संतोष सारुक यांनी भारतातील पाच वर्षांखालील बालकांच्या पोषणस्थितीतील प्रवाह, अंदाज व प्रमुख घटकांवर सखोल संशोधन केले आहे. या संशोधनामुळे संतोष सारुक यांना छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम या वैद्यकीय क्षेत्रातील अभिमत विद्यापीठाने बायोस्टॅटिस्टिक्स या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या समुदाय वैद्यकशास्त्र विभागातून त्यांनी संशोधन केले आहे. संतोष सारुक यांनी भारतातील पाच वर्षांखालील बालकांच्या पोषणस्थितीतील प्रवाह, अंदाज व प्रमुख घटकांचा अभ्यास : १९९८ ते २०२१ या कालावधीतील चार राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणांवर आधारित प्रमुख पोषण निर्देशकांचे विश्लेषण' या विषयावर सखोल संशोधन केले आहे.
या संशोधनामध्ये त्यांनी भारतातील पाच वर्षांखालील बालकांमधील खुंटलेली वाढ (Sunting), कृशता (Wasting) आणि कमी वजन (Underweight) या प्रमुख पोषण निर्देशकांचा अभ्यास केला. तसेच, बालकांचे संबंधित घटक, मातेशी संबंधित घटक सामाजिक-आर्थिक घटक आणि भौगोलिक घटक यांचा कुपोषणाशी असलेला संबंध विविध सांख्यिकीय पद्धतींच्या साहाय्याने अभ्यासला आहे. यासाठी सारुक यांनी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या चार फेऱ्यांमधील उपलब्ध माहितीचे शास्त्रीय व सांख्यिकीय पद्धतीने विश्लेषण केले असून, याद्वारे भारतातील बालकांच्या पोषणस्थितीतील बदलांचा अभ्यास केला आहे.
मुळचे सारूकवाडी येथील रहिवासी असलेले संतोष सारक हे सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधर असून सध्या ते राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे सार्वजनिक आरोग्य, जैवसांख्यिकी आणि बालकांचे पोषण या क्षेत्रांतील कार्यांना अधिक बळ मिळाले आहे. या संशोधनासाठी त्यांना डॉ. राजेश दासे व डॉ. पांडुरंग थाटकर यांनी मार्गदर्शन केले.
