Pune zp global guruji : पुणे झेडपीच्या शाळेतील गुरुजींची सिंगापूरला होणार 'ज्ञानयात्रा'!

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला पुणे झेडपीकडून ‘ग्लोबल गुरुजी’ योजनेंतर्गत ४५ गुरुजी आणि ३ केंद्रप्रमुखांची अंतिम निवड जाहीर 

Pune zp global guruji : पुणे झेडपीच्या शाळेतील गुरुजींची सिंगापूरला होणार 'ज्ञानयात्रा'!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ४ सप्टेंबर २०२६ :- पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील जिल्हा परिषद शाळेत मुलांच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने पाहणारे झेडपी शाळेचे गुरुजी आता थेट सिंगापूरच्या शाळांमध्ये शिक्षणाच्या नव्या पद्धतीची धडे गिरविणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेने चालू शैक्षणिक वर्षांपासून सुरू केलेल्या 'ग्लोबल गुरुजी ' योजनेंतर्गत झेडपी शाळांमधील ४५ शिक्षक आणि ३ केंद्रप्रमुखांची निवड करण्यात आली आहे.

यंदाच्या शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी पुणे जिल्हा परिषदेने या शिक्षकांची निवड यादी जाहीर केली आहे. यामुळे झेडपीच्या ४५ शिक्षकांना यंदाच्या शिक्षकदिनी ही अनोखी भेट मिळाली आहे. निवड झालेल्या या गुरुजींची 'ज्ञानयात्रा' आता सिंगापूरला जाणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कधी मोजक्या साधनांमध्ये, तर कधी अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांसाठी ही 'ज्ञानयात्रा, त्यांच्या वैयक्तिक प्रगतीपुरती मर्यादित राहणार नसून, ती झेडपीच्या शाळांमधील ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेने चालू शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पहिल्यांदाच 'ग्लोबल गुरुजी’ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परदेशातील शिक्षणाच्या अध्यापन पद्धतीचा अभ्यास करण्याची संधी जिल्हा परिषद शिक्षकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यानुसार पहिल्या वर्षी म्हणजेच यंदा सिंगापूर प्रशिक्षण दौऱ्यासाठी ४५ शिक्षक आणि तीन केंद्रप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाधारित शिक्षण, नवोपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

या योजनेसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी निवड करण्यासाठी इच्छुक शिक्षका़ची आधी लेखी परीक्षा घेण्यात आली.  लेखी परीक्षेनंतर मुलाखतीच्या बहुस्तरीय प्रक्रियेतून अंतिम ४५ शिक्षकांची निवड करण्यात आली. मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) या संस्थेच्या सहकार्याने ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. 

सिंगापूरचा अनुभव, पुणे झेडपीच्या शाळांमधील मुलांसाठी उपयुक्त ठरणार - अध्यक्ष वीरधवल जगदाळे 

या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सिंगापूरला जाणाऱ्या ४५ शिक्षकांपुरते त्यांचे यश मोजले जाणार नाही. कारण हे सर्व गुरूजी प्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर हे शिक्षक ‘शिक्षण दूत’म्हणून काम करणार आहेत. सिंगापूर येथील शिकवण्याच्या नव्या पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर व शैक्षणिक नवोपक्रम आपल्या तालुक्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी या शिक्षकांवर असणार आहे. याचाच अर्थ सिंगापूरच्या वर्गखोलीत शिकलेला एखादा नवा धडा काही दिवसांनी पुणे जिल्ह्यातील एखाद्या दुर्गम गावातील वर्गखोलीत शिकविला जाणार आहे. त्यामुळे यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याची नवी संधी मिळणार आहे. एखाद्या शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळणार आहे. हीच या उपक्रमाची खरी ताकद असणार आहे.

जागतिक दर्जाच्या शिक्षणपद्धतींचा अनुभव घेणे व त्या पद्धती आपल्या स्थानिक परिस्थितीशी जोडणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. सिंगापूर येथील प्रशिक्षण जशास तसे आणण्याऐवजी त्यातील उपयुक्त गोष्टी आपल्या ग्रामीण शाळांच्या गरजेनुसार वापरण्याचा प्रयत्न होणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत, या अनुभवाचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेला व्हावा, अशी अपेक्षाही जगदाळे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. हा केवळ परदेश प्रशिक्षण दौरा नसून शैक्षणिक गुणवत्तावाढीची व्यापक चळवळ असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी म्हटले आहे.

अंतिम निवड झालेल्या शिक्षकांची तालुकानिहाय यादी 

१) आंबेगाव --- नितीन बर्वे, सावकार अरगडे, कामिनी थोरात.

२) बारामती --- सुगत टोपरे, पंढरीनाथ कामठे, प्रीतम सातपुते, प्रवीण कुलकर्णी.

३) भोर ---  स्वाती महानगरे, मारुती चौधरी, सुवर्णा कापरे.

४) दौंड --- अमर खेडेकर, दत्तात्रेय बारवकर, आदिनाथ  बनकर, सीमा महाडिक, सोनाली गायकवाड.

५) हवेली --- शंकर बडे, सुवर्णा पवार.

६) इंदापूर --- दत्तात्रेय छगनराव शिंगाडे, सागर भोसले, दत्तात्रेय नवनाथ शिंगाडे, संदीप येवले.

७) जुन्नर --- निलेश टिकेकर, धनश्री दाते, रश्मी डुंबरे, अमर केदारी.

८) खेड --- अनिता परदेशी, सुनील मापारी, शीतल पाचारणे, दीपक रेटावडे, मंगल काटले, विशाल बार्वेकर.

९) मावळ --- मनीषा उघडे, दीपाली अंगिर, मैना सरवदे, श्रीनिवास शिंदे.

१०) मुळशी --- उज्ज्वला नारायणकर,माधवी चिंबालकर.

११)  पुरंदर ---  चंद्रकांत घरमालकर, विद्या म्हेत्रे.

१२) शिरूर ---  अर्चना जगताप, संतोष वेताळ, गणेश वाढे, मीनाक्षी अनोसे. 

१३) राजगड --- शीतल जाधव, पुरुषोत्तम कुलकर्णी. 

केंद्रप्रमुखांची यादी 

अंकुश बढे (आंबेगाव), कमलाकांत मुंढे (जुन्नर), शोभा होळकर (बारामती).