Cyber security training programme: हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव शालेय विद्यार्थ्यांसमोर उलगडले!
सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
ग्रामराज्य वृत्तसेवा
साकरे, (जि. जळगाव), दि. ८ ऑगस्ट २०२६ :- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी हे सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असल्याने त्यांच्यामध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याच उद्देशाने जळगाव जिल्ह्यातील साकरे येथील बा. च.भाटिया माध्यमिक विद्यालयात विशेष सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र सायबर जनजागृती अभियानांतर्गत कार्यरत सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे विविध पैलू समजावून सांगितले.ऑनलाइन फसवणूक, फिशिंग,डेटा चोरी, बनावट सोशल मीडिया खाती, फेक लिंक,ऑनलाइन गेमिंग फ्रॉड आणि मोबाईल अॅप्समधील धोके याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते हॅकरचा मुखवटा वापरून करण्यात आलेले विशेष प्रात्यक्षिक. या माध्यमातून विद्यार्थ्यांना हॅकर लोकांची माहिती कशा प्रकारे मिळवतात, त्यांची फसवणूक कशी करतात आणि आर्थिक नुकसान कसे घडवून आणतात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे वास्तव प्रत्यक्ष अनुभवातून समजण्यास मदत झाली.
याशिवाय विविध खेळ, प्रश्नमंजुषा आणि संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. आर. बी.आमले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
जामनेर येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही सायबर सुरक्षेची व्यापक जनजागृती
दरम्यान, जामनेर येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्येही विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार आणि सुरक्षित डिजिटल जीवनासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजावी आणि भविष्यातही त्याचा उपयोग व्हावा यासाठी Quick Heal Foundation तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायबर सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिकांचे (Guideline Books) वितरण करण्यात आले. या पुस्तिकांमध्ये सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय, सुरक्षित इंटरनेट वापराचे नियम, सोशल मीडिया सुरक्षेच्या टिप्स आणि डिजिटल व्यवहारांमधील आवश्यक खबरदारी याविषयी उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे प्राचार्य एस. एस. पाटील यांनी या कौतुक करत विद्यार्थ्यांना मिळालेली माहिती त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल, असा विश्वास व्यक्त केला व विद्यार्थ्यांनी स्वतः सुरक्षित राहून आपल्या कुटुंबीयांनाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्याचे आवाहन केले. शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेचे नियम पाळण्याची आणि सुरक्षित डिजिटल समाज निर्मितीसाठी योगदान देण्याची शपथ घेतली.
