Katraj Dairy annual meeting: पुणे जिल्हा दूध संघाची (कात्रज डेअरी) उलाढाल ३८७ कोटींवर पोहोचली, दूध उत्पादकांना १३ कोटी ५० लाख रुपयांचा दरफरक वाटप!
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांची माहिती : येत्या सोमवारी ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ सप्टेंबर २०२६ :- पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक दूध उत्पादक संघाची (कात्रज डेअरी) वार्षिक उलाढाल सरत्या आर्थिक वर्षात (दि. ३१ मार्च २०२६ अखेर) ३८७ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगला दर देण्याबरोबरच पशुसंवर्धन, पशुखाद्य, आधुनिक तंत्रज्ञान, अधिक गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थ आणि बाजारपेठ विस्तारावर भर देत जिल्हा दूध संघाने सरत्या आर्थिक वर्षात भरीव कामगिरी केली आहे. या वर्षात दूध संघाला १ कोटी ५ लाख ५७ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, दूध उत्पादकांना १३ कोटी ५० लाख २४ हजार रुपयांचा दूध दरफरक अदा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी दिली.
पुणे जिल्हा दूध संघाची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चांभारे बोलत होते. यावेळी संघाचे उपाध्यक्ष मारुती जगताप, माजी अध्यक्ष व संचालक गोपाळ म्हस्के, विष्णू हिंगे, बाळासाहेब खिलारी, केशर पवार, स्वप्नील ढमढेरे, संचालक राहुल दिवेकर, लता गोपाळे, निखिल तांबे, व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये आदी उपस्थित होते.
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अरुण सिताराम चांभारे यांनी यावेळी दूध संघाच्या वर्षभरातील कामकाजाची माहिती दिली. ते म्हणाले, "सरत्या आर्थिक वर्षात दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दूधासाठी सरासरी ३५ रुपये २४ पैसे प्रतिलिटर, तर म्हैस दूधासाठी ५५ रुपये २७ पैसे प्रतिलिटर दर दिला. मागील वर्षाच्या तुलनेत गाय दूधाच्या दरात ५ रुपये ७७ पैसे, तर म्हैस दूधाच्या दरात २ रुपये ७३ पैशांची वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ८६० दूध संस्थांमार्फत दूध संकलन केले जाते. दूध संघाच्या १३१ बल्क मिल्क कूलर आणि आठ शीतकरण केंद्रांच्या माध्यमातून मागील वर्षात ६०४.३४ लाख लिटर गाय दूध आणि ४४.७६ लाख लिटर म्हैस दूध संकलित करण्यात आले आहे. दूध उत्पादकांना उत्पादन खर्च कमी करून अधिक फायदा मिळावा, यासाठी मिनरल मिक्चर, बियाणे, कडबा कुट्टी मशीन आणि रबर मॅट आदी वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत."
दरम्यान, जिल्हा दूध संघाने सन २०२५-२६ मध्ये ९१ हजार ८६२ बॅग म्हणजे ४,५९३.१० मेट्रिक टन पशुखाद्य आणि ९२४ बॅग मुरघासाची विक्री केली. पशुखाद्य खरेदी करणाऱ्या संस्था आणि डेअरी फार्मना प्रोत्साहन देण्यासाठीही आर्थिक प्रोत्साहन देण्यात आले. जिल्ह्यातील पशूसंवर्धनासाठी ७३ शिबिरे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी वैद्यकीय सेवा, जंत व गोचीड निर्मूलन, लसीकरण आणि कृत्रिम रेतन यावर दूध संघाने अधिक भर दिल्याचे चांभारे यांनी यावेळी सांगितले.
सध्या दूध संघाच्या कार्यक्षेत्रात २० कृत्रिम रेतन केंद्रे कार्यरत असून, गेल्या वर्षभरात ८ हजार ६६८ गायी आणि २ हजार १०८ म्हशींना कृत्रिम रेतन सेवा देण्यात आली. याशिवाय आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेच्या पशुधनाची पैदास करण्याचा उपक्रमही राबविण्यात येत असून, आतापर्यंत ५७ वासरांची पैदास झाली आहे. अवसरी आणि तळेगाव ढमढेरे येथे जनावरांसाठी मेडिकल स्टोअर सुरू करण्यात आले असून, जंत आणि गोचीड निर्मूलनाची औषधे ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा दूध संघाची कामगिरी दृष्टीक्षेपात...!
- निव्वळ नफा --- १ कोटी ५ लाख रुपये.
- दूध दरफरक वाटप --- १३ कोटी ५० लाख रुपये.
- वार्षिक उलाढाल --- ३८७ कोटी रुपये.
- जिल्ह्यातील दूध संस्था --- ८६०.
- सरत्या आर्थिक वर्षात गाय दूधाचा सरासरी दर (प्रतिलिटर ) --- ३५ रूपये २४ पैसे.
- म्हैस दूधाचा सरासरी दर (प्रतिलिटर ) --- ५५ रुपये २७ पैसे.
- गाय दूध संकलन --- ६०४.३४ लाख लिटर.
- म्हैस दूध संकलन --- ४४.७६ लाख लिटर.
- पशुखाद्य विक्री --- ४,५९३.१० मेट्रिक टन.
- आधुनिक पार्लर --- ३८०.
- पशुसंवर्धन शिबिरे --- ७३.
- कृत्रिम रेतन केंद्रे --- २०.
