Pune Zp model school and phc : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पुणे झेडपीचा मॉडेल स्कूल अन् मॉडेल आरोग्य केंद्र उपक्रम उपयुक्त!
ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे गौरवोद्गार: पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई आरोग्य केंद्र व शाळेची सचिवांकडून पाहणी
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेचे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र ( मॉडेल पीएचसी) आणि मॉडेल जिल्हा परिषद शाळा ( मॉडेल स्कूल) हे दोन्ही उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत, असे गौरवोद्गार काढत राज्याचे ग्रामविकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या दोन्ही उपायुक्तांबाबत पुणे जिल्हा परिषदेचे तोंडभरून कौतुक केले.
ग्रामविकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत, येथील सुविधांची पाहणी केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे आदी उपस्थित होते. या भेटीत डॉ. पुलकुंडवार यांनी आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी उभारण्यात आलेल्या स्कील लॅबची पाहणी केली. तेथील स्वच्छता, सुबक व्यवस्था आणि सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आधुनिक व पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुणे जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणेच्या कामाचा आढावा सचिव डॉ. पुलकुंडवार यांनी घेतला.
‘खऱ्या अर्थाने मंदिराची अनुभूती देणारे आरोग्य मंदिर’
वाडेबोल्हाई येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करताना डॉ. पुलकुंडवार यांनी तेथील स्वच्छता, सुबक व्यवस्था, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली. आरोग्य केंद्रातील सुविधांचे कौतुक करताना त्यांनी खऱ्या अर्थाने मंदिराची अनुभूती देणारे आरोग्य मंदिर अशा शब्दांत गौरवोद्गार काढले.
मॉडेल शाळेतील शैक्षणिक सुविधांची पाहणी
यानंतर डॉ. पुलकुंडवार यांनी वाडेबोल्हाई येथील मॉडेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी आणि शाळांमध्ये आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला.
स्कील लॅबच्या उपक्रमाचे विशेष कौतुक
शाळेतील स्कील लॅब अर्थात कौशल्य विकास प्रयोगशाळेची पाहणी हा या भेटीतील महत्त्वाचा भाग ठरला. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती डॉ. पुलकुंडवार यांनी घेतली.
