E-waste collection : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या उत्तमनगर येथील माध्यमिक विद्यालयात २०० किलो ई-कचऱ्याचे संकलन!
बीआयएस (BIS) क्लबचा पर्यावरणपूरक उपक्रम : शालेय विद्यार्थ्यांमध्ये ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि.१३ ऑक्टोबर २०२६ :- इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट, पुनर्प्रक्रिया व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या उत्तमनगर येथील माध्यमिक विद्यालयात भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) क्लबतर्फे ई-कचरा संकलन व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सुमारे २०० किलो ई-कचरा संकलित करून पुनर्प्रक्रियेसाठी अधिकृत संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मोबाईल, लॅपटॉप, चार्जर, केबल, कीबोर्ड आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन केले. तसेच यावेळी जनजागृती रॅली,माहितीपट आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. संकलित ई-कचऱ्याचे वैज्ञानिक निकषांनुसार वर्गीकरण व गुणांकन करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे, तर सहभागी विद्यार्थ्यांना स्टेशनरीचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, यावेळी ग्रीनबे एंटरप्रायजेसचे प्रशांत कदम यांनी ई कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेतील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्प्रक्रिया, त्यातील उपयुक्त धातूंची पुनर्प्राप्ती आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली.
संकलित करण्यात आलेला सुमारे २०० किलो ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मान्यताप्राप्त ई-कचरा पुनर्प्रक्रिया संस्था असलेल्या ग्रीनबे एंटरप्रायजेस (Greenbay Enterprise) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रक्रियेबाबत संस्थेकडून पुनर्प्रक्रिया व विल्हेवाट प्रमाणपत्र देण्यात आले. मुख्याध्यापक अंकुश खोपडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमात बीआयएस क्लबच्या ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका हेमलता जावळकर, चेतन डिंबळे आणि सुनील शिंदे उपस्थित होते.
बीआयएस क्लबच्या मार्गदर्शिका प्रांजल दीक्षित, बीआयएस संस्थेचे मूल्यमापन अधिकारी किरण देशपांडे व हर्षवर्धन शुक्ला यांनीही मार्गदर्शन केले. ई-कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट ही पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ई-कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करून त्याची अधिकृत केंद्रांमार्फत पुनर्प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचा सल्ला यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सवयींची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली.
