Re-examination of disabled teachers back to Sassoon : झेडपी गुरूजींच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी पुन्हा ससूनकडे, जे. जे. रुग्णालयाचा नकार! 

येत्या मंगळवारपासून तपासणीला सुरुवात : १७८ जणांची औंध येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी

Re-examination of disabled teachers back to Sassoon : झेडपी गुरूजींच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी पुन्हा ससूनकडे, जे. जे. रुग्णालयाचा नकार! 
पुणे :- दिव्यांगत्व फेरतपासणीसाठी रुग्णालयात उपस्थित दिव्यांग शिक्षकांबाबतचे ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १५ सप्टेंबर २०२५ :-  ससून रुग्णालयाच्या पाठोपाठ मुंबईतील जे.जे. रुग्णालयानेही झेडपी गुरूजींच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. शिक्षकांना ज्या रुग्णालयांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे, त्याच रुग्णालयांनी ही फेरतपासणी करणे गरजेचे असल्याचे मत जे. जे. रुग्णालयाने पुणे जिल्हा परिषदेला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील दिव्यांग गुरूजींच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी आता औंध येथील जिल्हा रुग्णालय आणि ससून हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या मंगळवारपासून (दि.१६ सप्टेंबर) ही फेरतपासणी सुरु होणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असलेल्या एकूण ४२८ दिव्यांग गुरूजींच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी केली जाणार आहे. यापैकी २५० गुरूजींची ससून तर, उर्वरित १७८ गुरूजींची जिल्हा रुग्णालयात ही फेरतपासणी केली जाणार आहे. ही फेरपडताळणी पूर्ण झाल्याशिवाय एकाही दिव्यांग शिक्षकाला जिल्हांतर्गत बदलीतून सूट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेतील काही शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदलीतून सूट मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र यापैकी अनेक दिव्यांग प्रमाणपत्रे ही बोगस असल्याबाबच्या तक्रारी जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांनी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. 

या तक्रारींची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गंभीर दखल घेतली होती‌ आणि यानुसार शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी याबाबत ससून रुग्णालयाला पत्र पाठविले होते. या पत्रासोबत जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांची यादी देण्यात आली होती.परंतू,ही फेरतपासणी करण्यास ससून रुग्णालयाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात नकार दिला होता. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने या शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू याही रुग्णालयाने नकार दिला आहे. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांच्या खंडानंतर आता पुन्हा ही फेरतपासणी ससून आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे.

दिव्यांगत्व फेरतपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे 

- मुळ दिव्यांग प्रमाणपत्र
- युडीआयडी कार्ड
- मुळ आधारकार्ड 
- दिव्यांगत्वाच्या अनुषंगाने संबधित सर्व कागदपत्रे

औंधमधील जिल्हा रुग्णालयात कोणती दिव्यांग प्रमाणपत्रे तपासणार 

ज्या शिक्षकांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तालुका किंवा गाव पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशा शिक्षकांना औंध येथील जिल्हा रुग्णालयाने हे प्रमाणपत्र दिलेले आहे. या प्रमाणपत्रांचे आणि थेट औंध येथील जिल्हा रुग्णालयातून काढण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी ही औंध येथील रुग्णालयात केली जाणार आहे.

ससून रुग्णालयातील फेरतपासणीचे वेळापत्रक 

- दि. १६ सप्टेंबर २०२५ --- शिरूर व हवेली तालुका --- यादीतील  १ ते ५३ क्रमांकाचे शिक्षक 

-  दि. १८ सप्टेंबर २०२५ --- दौंड व आंबेगाव तालुका --- ‌अनुक्रमांक ५४ ते ९७ 

- दि. २३ सप्टेंबर २०२५ --- भोर, मावळ, जुन्नर व वेल्हे तालुका --- अनुक्रमांक ९८ ते १४६ 

- दि. २५ सप्टेंबर २०२५ --- बारामती व पुरंदर --- अनुक्रमांक १४७ ते २०६ 

- दि. ३० सप्टेंबर २०२५ --- राजगुरुनगर (खेड) --- अनुक्रमांक २०७ ते २५० 

औंध जिल्हा रुग्णालयातील फेरतपासणीचे वेळापत्रक 

- दि. १६ सप्टेंबर २०२५ --- इंदापूर, दौंड, हवेली आणि शिरूर तालुका 

- दि. १९ सप्टेंबर २०२५ --- मावळ, मुळशी, आंबेगाव व वेल्हे 

- दि. २२ सप्टेंबर २०२५ --- पुरंदर, बारामती, भोर व जुन्नर 

- दि. २३ सप्टेंबर २०२५ --- खेड