जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता सहावी, सातवीचे विद्यार्थी गिरवणार खगोल विज्ञान आणि खगोल भौतिकीचे धडे!
पुणे झेडपी आणि 'आयुका'मध्ये सामंजस्य करार : ईस्त्रो व 'नासा'लाही भेट देणार

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २६ एप्रिल २०२५ :- 'हम भी कुछ नहीं' या हिंदी वाक्प्रचाराचा प्रत्यय आता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी प्रत्यक्षात घेणार आहेत. कारण पुणे जिल्हा परिषदेने आता ग्रामीण भागातील शालेय विज्ञानाची गोडी लागावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने पुण्यातील 'आयुका' या विज्ञानविषयक संशोधन संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे.
या करारामुळे जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता सहावी आणि सातवीचे विद्यार्थी आता खगोल विज्ञान व खगोल भौतिकीचे धडे गिरवणार आहेत. शिवाय यामुळे हे विद्यार्थी अगदी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ईस्त्रो) आणि नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) या संशोधन संस्थांनाही भेटी देणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सामंजस्य करारावर शुक्रवारी (दि.२५ एप्रिल) जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि 'आयुका'चे संचालक प्रा. रघुनाथन श्रीआनंद यांनी सह्या केल्या. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गातील ७५ विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना खगोल विज्ञान आणि खगोल भौतिकीचे (अवकाश विज्ञान) प्रशिक्षण दिले जाणार आहे. यापैकी ५० विद्यार्थ्यांना 'इस्त्रो' येथे शैक्षणिक भेटीसाठी आणि २५ विद्यार्थ्यांना 'नासा' येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले जाणार आहे.
यासाठी 'आयुका'च्या वतीने एका वर्षासाठी शैक्षणिक समृद्धीचे कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये विज्ञान कार्यशाळा, व्याख्याने आणि विज्ञान केंद्रांना भेटी देणे आदींचा समावेश असणार आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरचा अनुभव देत त्यांचे स्वप्न मोठे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.