Marathi literature Club (Vadmay Mandal) inaugurated at Savitribai Phule Pune University : केवळ पदव्या घेऊन विद्वत्ता ठरत नव्हे तर, आत्मजाणिवांचा शोध घेऊन समाजाचे प्रश्न सोडविणे हेच खरे ज्ञान! 

डॉ. विनय तुमराम यांचे मत : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी वाङमय मंडळाचे उद्घाटन व 'युवा स्पंदन' भित्तीपत्रकाचे अनावरण 

Marathi literature Club (Vadmay Mandal) inaugurated at Savitribai Phule Pune University : केवळ पदव्या घेऊन विद्वत्ता ठरत नव्हे तर, आत्मजाणिवांचा शोध घेऊन समाजाचे प्रश्न सोडविणे हेच खरे ज्ञान! 
पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात आयोजित करण्यात आलेल्या मराठी वाङ्ममय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे व विभागप्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांच्यासमवेत विद्यार्थी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ५ ऑक्टोबर २०२५ :-  केवळ पदव्या घेऊन विद्वता ठरत नसून, आत्मजाणिवांचा शोध घेऊन समाजाचे प्रश्न सोडविणे, म्हणजे खरे ज्ञान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आदिवासी साहित्यिक आणि विचारवंत डॉ. विनय तुमराम यांनी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी डॉ. तुमराम यांनी विद्यार्थ्यांना संत रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या 'ज्ञानलक्षणां' चे महत्त्व पटवून देत, ज्ञानाची उपयोगिता स्पष्ट करून दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागात आयोजित करण्यात आलेल्या मराठी वाङ्ममय मंडळाचे उद्घाटन व 'युवा स्पंदन' भित्तीपत्रकाचे अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते हे उद्घाटन आणि अनावरण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पराग काळकर, स्त्रीवादी अभ्यासक व  जेष्ठ साहित्यिक डॉ.अश्विनी धोंगडे, मानवविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे,  मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. प्रभाकर देसाई, अन्य प्राध्यापक आणि कर्मचारी,  विद्यार्थी, आणि पीच.डी. संशोधक उपस्थित होते.

डॉ. तुमराम पुढे म्हणाले, "आदिवासी समाजाकडे भारतीय वैदिक परंपरेचा दृष्टीकोन व आदिवासींचा माणूस म्हणून विचार न करता केवळ राक्षस म्हणून पाहत असून, यातूनच आदिवासींच्या जगण्याचे हक्क व अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने हिरावून घेतले आहेत.  आदिवासी समाज हा मूळनिवासी असून हा समाज या भारतातील शासन करणारी जमात होती. त्यांनी या भारतातील साधनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन केले आहे. भारताच्या स्वांतत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्या विरोधात बंड पुकारणारे हे सगळ्यात सुरुवातीला आदिवासीच होते‌." परंतु, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात आदिवासी समाजाचे स्थान कुठे आहे?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, स्त्रीवादी अभ्यासक अश्विनी धोंगडे यांनी स्त्री, स्त्रीवाद या दृष्टीकोनातून विचार व्यक्त केले.भारतीय पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीचे असणारे स्थान आणि अस्तित्वाचा आढावा घेऊन त्यांनी स्त्रीच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करून दिली. स्त्रीदेखील पुरुषांप्रमाणे उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यामुळे 'स्त्री केवळ कुटुंब, मुले-बाळे, शरीरसंबध यापुरती मर्यादित नसून तिचे स्थान एक व्यक्ती म्हणून पुरुषांप्रमाणे सामाजिक पातळीवर समतेचेअसल्याचे डॉ. अश्विनी धोंगडे यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय स्त्री आणि पाश्चात्त स्त्री यांच्या भावविश्वाची तुलना करून भारतीय स्त्रीनेदेखील सक्षम स्त्री म्हणून समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. 

या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत आणि महाराष्ट्र गीताने करण्यात आली. चित्रफितीच्या माध्यमातून पाहुण्यांची ओळख करून देण्यात आली. मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी मराठी विभागाच्या ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरेचा आढावा घेत, सद्यःस्थितीवर भाष्य केले. सूत्रसंचालन रामेश्वर मोरे या विद्यार्थ्यांने केले. अंकुश सूर्यवंशी यांनी आभार मानले.