कामठे विद्यालय आणि हौसाई सेमी इंग्लिश प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलमधील शिक्षकांचा गौरव 

विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेत मिळविलेले यश आणि उन्हाळी शिबिरानिमित्त संस्थेकडून शिक्षकांचे कौतुक 

कामठे विद्यालय आणि हौसाई सेमी इंग्लिश प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलमधील शिक्षकांचा गौरव 
पुणे:- उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आलेल्या शिक्षकासमवेत जालिंदर कामठे व विजया महाडिक.

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २८ एप्रिल २०२५ :-  कामठे विद्यालय आणि हौसाई सेमी इंग्लिश प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलमधील शिक्षकांचा वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे  अध्यक्ष जालींदर कामठे आणि शिक्षण तज्ज्ञ विजया महाडिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्री प्रायमरी व प्रायमरी  स्कूल आणि माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेत मिळवलेल्या शंभर टक्के यशाबद्दल आणि उन्हाळी शिबिरानिमित्त शिक्षकांचे  कौतुक करण्यात आले. 

शिक्षक वर्षभर विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतात.त्या शिक्षकांचे कौतुक करणे हे संस्थेचे कर्तव्य आहे. जेणेकरून शिक्षकांना नव्याने प्रेरणा मिळते आणि ते नव्या उमेदीने शिक्षण देण्याचे  काम करतात. म्हणून हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आल्याचे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांना चांगले संस्कार दिले गेले. मंथनपरीक्षेतील यशामुळे मुले स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वासू बनतात आणि जीवन यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची खूप गरज आहे. हे महत्व विद्यार्थ्यांना समजते, असेही कामठे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सारिका जगताप यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धनाथ गद्रे यांनी केले.  सागर गायकवाड यांनी आभार मानले.