Cyber security training: जळगाव जिल्ह्यातील बी.जे. महाजन आणि माणिकचंद काबरा या दोन माध्यमिक शाळांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती!
ऑनलाइन फसवणूक टाळण्याबाबत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
ग्रामराज्य वृत्तसेवा
धरणगाव, (जि. जळगाव), दि. ८ ऑगस्ट २०२६ :- जळगाव जिल्ह्यातील आणोरे येथील बी. जे. महाजन विद्यालय आणि सोनवद येथील माणिकचंद नारायण काबरे विद्यालय या दोन्ही माध्यमिक शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांना सायबर जनजागृतीबाबतचे धडे देण्यात आले.
डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी बी. जे महाजन विद्यालयात तर, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी माणिकचंद नारायण काबरे विद्यालयात या सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या जनजागृतीपर कार्यक्रमात स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना समजावून सांगितल्या. याशिवाय इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, सोशल मीडियावरील फसवणूक, बनावट लिंक, फिशिंग, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा सुरक्षित वापर याविषयी त्यांनी सोप्या आणि उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले.
