Tribal family living in a cave : ना घर, ना दार, ना शेतीवाडी, तरीही ५० गावरान गाईंच्या संवर्धनासाठी चक्क डोंगराच्या गुहेत राहून आयुष्य जगतेय वयोवृद्ध आदिवासी कुटुंब!
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील घटना : गाईंच्या ५० मुक्या जीवांसाठी आदिवासी कुटुंबाची अखंडितपणे झुंज
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ ऑगस्ट २०२६ :- गाय ही माय असते, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. पण आजच्या या आधुनिक जगात ही माय (गाय) दिवसेंदिवस नष्ट होत चालली आहे. परिणामी पुर्वीच्या काळी जनावरांच्या असलेल्या ५०- ५० खुटी आता मात्र अनेक कुटुंबातून कायमच्या गायब झाल्या आहेत. अनेकांनी दावणीच्या दावणी खुंटीवर टांगल्या आहेत. पण याला अपवाद ठरले आहे, एक वयोवृद्ध आदिवासी कुटुंब. ना घर, ना दार, ना शेतीवाडी, तरीही चक्क डोंगराच्या गुहेत राहून ५० गावरान गाईंचे संगोपन हे आदिवासी कुटुंब अखंडितपणे करत आहे.
हे काही एखाद्या चित्रपटातील कथानक किंवा काल्पनिक कथा नसून, पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात एका वयोवृद्ध आदिवासी कुटुंबांची सत्य कहाणी आहे. स्वतःला राहण्यासाठी घर नाही, थोडासा विसावा घेण्यासाठी दार नाही, गावरान गाईंचे संगोपन करण्यासाठी शेतीच नाही. मग गोठा करायचा कुठे, या विवंचनेत असलेल्या या आदिवासी कुटुंबांने गाईंच्या गोठ्यासाठी आणि स्वतःच्या निवासासाठी चक्क एका डोंगराच्या गुहेची निवड केली. या गुहेला समोरून कुडाची भिंत तयार केली. या कुडाच्या भिंतीतच गुरांना गुहेत प्रवेश करता यावा, यासाठी खुले दार तयार केले आहे.
ही कहाणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील भीमा श्रावण कवटे यांची आहे. जुन्नर तालुक्यातील कोपरे हे त्यांचे मूळ गाव आहे. पण गाईंच्या संवर्धनासाठी त्यांनी मूळ गाव सोडले आणि याच तालुक्यातील मांडवे गावाच्या हद्दीत येत असलेल्या एका डोंगराच्या गुहेत ५० गाईंसह आपला संसार थाटला आहे. त्यांच्या सोबतीला अर्थातच त्यांची अर्धांगिनी आहे. मांडवे गावातील बर्डीनाथ डोंगराच्या गुहेत हे कुटुंब वास्तव्यास आहे.
या डोंगराच्या परिसरात वीजेची सोय नाही. जनावरांसाठी पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे या जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्यांना दिवसातून किमान दोन वेळा डोंगराच्या खाली सुमारे तीन किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. परंतु, या गायी म्हणजे त्यांच्यादृष्टीने केवळ जनावरे नसून त्या त्यांच्या वडिलोपार्जित संपत्ती आहेत. त्यांच्या कुटुंबाचा इतिहास आहेत आणि जगण्याचा आधारही आहेत, असे भीमा कवटे सांगतात. दिवसभर डोंगर उतारावर गुरे चारणे, पाण्यासाठी दररोज लांबवर पायपीट करणे, उन्हाळ्यात प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करणे आणि रात्री पुन्हा त्या अंधाऱ्या गुहेत परतणे, हा त्यांचा रोजचा दिनक्रम आहे. वृद्धत्वाने शरीर थकले असले तरी, मनातील जिद्द अजूनही तरुण असल्याचे कवटे यांच्या कामातून स्पष्ट होत आहे.
आजच्या आधुनिक युगात अनेक जण सुख-सोयींच्या शोधात गाव सोडून शहरांकडे धावत आहेत. हे दांपत्य मात्र सर्व सुविधांपासून दूर राहून आपल्या परंपरेचे रक्षण करत आहे. त्यांच्यासाठी गुरे म्हणजे संपत्ती नसून कुटुंबातील सदस्यच आहेत.
पावसाळ्यात गुहेत ओलावा, हिवाळ्यात कडाक्याची थंडी आणि उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई अशी प्रत्येक ऋतू त्यांची परीक्षा घेतो. तरीही एकाही गायीला उपाशी ठेवायचे नाही, हा त्यांचा निर्धार आजही कायम आहे.या दांपत्याची कहाणी केवळ एका कुटुंबाचा संघर्ष नाही तर, ती ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील वास्तव अधोरेखित करणारी कथा बनली आहे.
पशुपालक भीमा कवटे यांची ही कहाणी केवळ दया निर्माण करणारी न ती माणूस, निसर्ग व मुक्या प्राण्यांमधील अतूट नात्याची साक्ष देणारी आहे. डोंगराच्या कुशीतल्या त्या अंधाऱ्या गुहेत राहणारे हे दांपत्य कदाचित प्रकाशापासून दूर असेल. पण त्यांच्या माणुसकीचा आणि प्राणिमायेचा प्रकाश समाजाला नवी दिशा देणारा आहे.
या कुटुंबापासून सरकारी योजना अद्याप लांबच
केंद्र व राज्य सरकारमार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. परंतू, अशा दुर्गम भागातील कुटुंबांपर्यंत त्या कितपत पोहोचतात, हा प्रश्न या गुहेतील गोठा आणि निवासस्थानामुळे निर्माण झाला आहे. परिणामी ज्या हातांनी आयुष्यभर गुरांची सेवा केली, त्या हातांना आता आधाराची गरज आहे. ज्या डोंगरांने त्यांना आसरा दिला, तेच डोंगर त्यांच्या जगण्याच्या अडचणीही वाढवत आहेत.
मरेन पण गाई विकणार नाही - भीमा कवटे
आमच्या या गाई वडिलोपार्जित संपत्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याशी लळा लागला आहे. त्या आमच्या कुटुंबाच्या सदस्या बनल्या आहेत. शिवाय याच गाईंच्या जीवावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे. त्यामुळे जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत या गाईंचा सांभाळ करणार. मरेन पण, गाई विकणार नाही, असे भीमा कवटे यांनी सांगितले.
--- अवघ्या ३० रुपये प्रति लिटर दराने दूध विक्री
सध्या पुणे शहरात गावरान गाईंच्या दुधाचा दर प्रति लिटर १०० रुपायांहून अधिक आहे. एवढेच जर्सी गाईंचे दूधही (पिशवीतले) प्रति लिटर ७० रुपायाने विकले जात आहे. परंतू, भीमा कवटे हे अस्सल गावरान गाईंचे दुध प्रति लिटर ३० रुपायांनी विक्री करत आहेत.
स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांमुळे घटना उघडकीस
जुन्नर तालुक्यातील डिंगोरे-उदापूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सोनाबाई दाभाडे यांच्या मतदारसंघातील ही घटना आहे. त्या आपल्या मतदारसंघातील सर्वेक्षण करत असताना, त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यामुळे आतापर्यंत स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास न आलेली घटना स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांमुळे उघडकीस आली आहे.
संबंधित कुटुंबाला सरकारी योजनेतून घर व गोठा द्या - सोनाबाई दाभाडे
दरम्यान, भीमा कवटे यांच्या कुटुंबाला एखाद्या सरकारी योजनेतून घर आणि गोठा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सोनाबाई दाभाडे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांची भेट घेऊन केली आहे.
