Cybersecurity Training for School Students: शालेय विद्यार्थ्यांनी गिरवले सायबर सुरक्षेचे धडे!
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील इंदिरा गांधी विद्यालय आणि पी.आर. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
ग्रामराज्य वृत्तसेवा
धरणगाव (जिल्हा जळगाव), दि. ४ ऑगस्ट २०२६ : सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असताना त्यासोबतच सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय आणि पी. आर. हायस्कूलमधील शालेय विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमाबरोबरच सायबर सुरक्षेचे धडे गिरवले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सायबर वॉरियर्स साक्षी तानाजी पाटील आणि विद्या विशाल सोनवणे यांनी या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, ओटीपी (OTP), पीन (PIN), पासवर्ड आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता तसेच सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित कसे ठेवावे याबाबतची सखोल माहिती देण्यात आली.
या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), फिशिंग लिंक्स (Phishing Links), बोगस संकेतस्थळे (Fake Websites), ओटीपी घोटाळा (OTP Scam), बनावट फोन कॉल्स (Fake Calls), पासवर्डची सुरक्षितता (Password Security), सामाजिक माध्यमे सुरक्षा (Social Media Safety) आणि सायबर गुन्हेगारी (Cyber Bullying)यांसारख्या विविध सायबर धोक्यांची माहिती देण्यात आली. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत ओटीपी ( OTP), पीन ( PIN), पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि ऑनलाइन व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असा महत्त्वपूर्ण संदेश या जनजागृती सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
सायबर सुरक्षेची माहिती विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी आणि मनोरंजक पद्धतीने समजावी यासाठी परस्पर संवादी उपक्रम (Interactive Activities), प्रश्नमंजुषा आणि खरे-खोटे खेळ (Right-Wrong Games) घेण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध प्रकारच्या ऑनलाइन परिस्थितींमध्ये कोणते वर्तन सुरक्षित आणि कोणते धोकादायक आहे, हे विद्यार्थ्यांनी स्वतः ओळखले. तसेच विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली.
या उपक्रमासाठी शिक्षक राजू आमले यांचे मार्गदर्शन लाभले. पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश पाटील यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर सजगपणे, जबाबदारीने आणि सुरक्षितपणे करावा, स्वतःसोबत आपल्या कुटुंबीयांमध्येही सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, असा संदेश या जनजागृती उपक्रमातून देण्यात आला.
डिजिटल युगातील सुरक्षित व जबाबदार नागरिक घडविण्याच्या दिशेने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सायबर वॉरियर्स यांनी राबविलेला हा जनजागृतीपर उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. या उपक्रमाचे दोन्ही शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.
