Pune zp model school, phc programme started :- ... आता पारंपारिक अध्यापन पद्धती सोडा अन् शिक्षण क्षेत्रात कृत्रीम बुद्धीमत्तेचा (ए.आय.) वापर वाढवा!
पुणे झेडपीच्या गुरुजींना अजित पवार यांचा सल्ला : मॉडेल स्कूल, आरोग्य केंद्रांचे उद्घाटन, मागील दोन वर्षांचे जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १४ जून २०२५ :- सध्या जमाना खुप बदलला आहे. जुनं ते सोनं म्हणण्याचे दिवस आता संपले आहेत. त्याऐवजी आता नव्या बदलांचा स्वीकार करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी गुरूजींनी आता जुन्या, कालबाह्य व पारंपरिक अध्यापन पद्धतीला फाटा द्यावा आणि आता अध्यापन पद्धतीत कृत्रीम बुद्धीमत्तेचा (ए. आय.) वापर वाढवावा, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.१४ जून) पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुरुजींना दिला.
पुणे जिल्हा परिषदेच्या पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आणि मागील दोन वर्षांतील जिल्हा शिक्षक आणि अध्यक्ष चषक पुरस्कारांचे वितरण शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शालेय शिक्षण मंत्री दादाभुसे,आमदार सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, "बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता, शैक्षणिक परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून नवीन पिढी घडविण्याकरीता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न केले पाहिजेत. राज्यातील विविध प्रयोगशील शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवित आहेत. त्यांच्या उपक्रमाचे अन्य शिक्षकांनीही अनुकरण केले पाहिजे."
राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, याकरीता राज्य सरकारच्यावतीने अंगणवाडी ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या खर्चासाठी १ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतो. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंगणवाडी, प्राथमिक शाळेसाठी वर्गखोल्या उभारण्याकरीता प्राधान्य देण्यात येत आहे. जर्मनी येथील बाडेन-वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार राज्य सरकारने केला आहे. हजारो वर्षापासून मराठी भाषेचे असलेले अस्तित्व टिकविण्यासाठी इंग्रजी शाळेत पहिलीपासून मराठी भाषा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व सुविधांनीयुक्त उत्कृष्ट ‘शालेय शिक्षण भवन’ उभारण्यात येत असून लवकर त्याचे उद्धघाटन करण्यात येणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
'सरपंच आणि ग्रामपंचायतीने गावातील शिक्षणाची जबाबदारी घ्यावी'
शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायतीने सामाजिक जबाबदारी ओळखून आपापल्या गावातील शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण शिक्षण ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाली पाहिजे. ग्रामसभेत शिक्षणाच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, प्रत्येक गावात शैक्षणिक मेळावे घ्यावेत. शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. उच्च पदावर कार्यरत अधिकाऱ्यांनी विद्यार्थी या नात्याने शाळेला मदत केली पाहिजे. शाळेचा दर्जा सुधारण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात पारदर्शकता, गुणवत्ता, दर्जा वाढीसोबतच आवश्यकतेप्रमाणे बदल केले पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
पुणे झेडपीचे हे दोन्ही उपक्रम शिक्षण व आरोग्य क्षेत्रात गुणात्मक बदल घडवतील :- अजित पवार
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाला आधुनिकतेची जोड देण्याकरीता जिल्हा परिषदेने ३०८ शाळांमध्ये ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमामुळे आरोग्य सेवा ही डिजीटल, स्वयंपूर्ण, सर्वसमावेशक होऊ शकणार आहे. शिवाय ही आरोग्य केंद्रे सर्व सुविधांनीयुक्त ग्रामीण आरोग्य सेवेचा नवा चेहरा ठरतील. आगामी काळात पुणे मॉडेल शाळा, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र हे दोन्ही उपक्रम शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुणात्मक बदल घडविण्यास उपयोगी ठरतील. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व संबंधित अधिकारी, शिक्षक, सामजिक संस्था, नागरिकांनी योग्य समन्वय राखून काम करावे. याकामी शिक्षकांना प्रशिक्षित करुन त्यांना सक्षम करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अजित पवार यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रास्ताविक केले. पुणे जिल्ह्यातील झेडपीच्या ३ हजार ५४६ शाळांपैकी ३०३ शाळा या पुणे मॉडेल स्कूल आणि १०८ प्राथमिक आरोग्य केंद्र ही पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेली आहेत. शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण करण्याबरोबरच याच्या माध्यमातून दर्जेदार आणि सर्वसमावेशक सेवा देणे हा मुख्य उद्देश असल्याचे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही मनोगत व्यक्त केले. पवार यांच्या हस्ते यावेळी पुणे मॉडेल स्कुल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मॉडेल स्कुल लोगो प्रकाशित करण्यात आला. भुसे यांच्या हस्ते 'पुणे निपुण' डॅशबोर्डचे प्रकाशन करण्यात आले. मॉडेल स्कुल उभारणीसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या ७ संस्थांसोबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मागील दोन वर्षांचे जिल्हा शिक्षक पुरस्कार, झेडपी अध्यक्ष चषक पुरस्कार प्रदान करण्यात आले. 'ज्ञानदर्शन' या कृतीपुस्तिका संचाचे प्रकाशन आणि 'मुख्यमंत्री माझी शाळा सूंदर शाळा' टप्पा क्र.२ मध्ये पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या शाळांना गौरविण्यात आले.