पुणे जिल्हा गुणवत्ता संवर्धन अभियानात प्रतिभाताई पवार विद्यालयाचे घवघवीत यश!
माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता संवर्धन अभियान

प्रा. मीरा बडे-सांगळे: ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ एप्रिल २०२५ :- पुणे जिल्हा शालेय गुणवत्ता संवर्धन अभियान स्पर्धेत कोंढवा बुद्रुक (ता. हवेली) येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक व हौसाबाई सोपानराव कामठे उच्च माध्यमिक विद्यालयाने (कनिष्ठ महाविद्यालय) पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला.या दोन्ही शाळांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील सुमारे 200 शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, खजिनदार प्राचार्य शिवाजीराव कामठे, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी सचिव शांताराम पोखरकर, जिल्हा संघाचे विश्वस्त अरुण थोरात व शिवाजीराव किलकिले, पुणे जिल्हा विद्या समितीचे सचिव प्राचार्य भानुदास रिठे, पुणे शहर अध्यक्ष शिवाजी शिंदे, प्रकाश बोरसे, प्राचार्य राज मुजावर, आय.आय.बी.या इन्स्टिट्यूटचे संचालक महेश लोहारे व पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सहकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोंढवा येथील प्रतिभाताई पवार विद्यालयास हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे म्हणाले,"शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता संवर्धन अभियान हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अभियान शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सातत्याने सुधारणा करणे, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती स्विकारणे, शिक्षकांचे सक्षमीकरण करणे आणि शाळांची एकूण कार्यक्षमता वाढवणे, यावर लक्ष केंद्रित करत आहे.या शिक्षण संवर्धनाचा फायदा नक्कीच शाळांना होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडणार आहे."
दरम्यान, पुणे जिल्हा गुणवत्ता संवर्धन अभियानात प्रतिभाताई पवार विद्यालय आणि हौसाबाई सोपानराव कामठे उच्च माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.