Prof. Ratanlal Sonagra passes away : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांचे निधन
पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना घेतला अखेरचा श्वास: सोमवारी अंत्यसंस्कार होणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ११ जानेवारी २०२६ :- ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. रतनलाल सोनग्रा यांचे रविवारी (दि.११ जानेवारी) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १२ जानेवारी) सकाळी साडे अकरा वाजता येरवडा येथील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान, अंत्यसंस्कारापुर्वी म्हणजेच सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडेदहा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या विमाननगर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.
प्रा. सोनग्रा हे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या विचारांचे पुरस्कर्ते, विचारवंत, प्रख्यात लेखक, संशोधक होते. त्यांनी बौद्ध साहित्य आणि मानवतावादी समाजसुधारकांच्या कार्यावर आधारित मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती केली आहे.
प्रा. सोनग्रा यांनी काही काळ मुंबईतील वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालया प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले असून वृत्तपत्रांतून त्यांनी ' सोनग्राफी ' या स्तंभातून लेखन केलेले आहे. आरती सोनग्रा या त्यांच्या कन्या होत.
