Pune Zp Model School : पुणे झेडपीच्या मॉडेल स्कूलच्या निकृष्ट कामांची आधी त्रयस्थ संस्थेकडून सखोल चौकशी करा! 

पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनची जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडे मागणी : वस्तुनिष्ठता तपासणी आवश्यक असल्याचे रवींद्र भोसले यांचे मत

Pune Zp Model School : पुणे झेडपीच्या मॉडेल स्कूलच्या निकृष्ट कामांची आधी त्रयस्थ संस्थेकडून सखोल चौकशी करा! 
पुणे:- जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याशी चर्चा करताना पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले व अन्य पदाधिकारी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २९ ऑगस्ट २०२६ :- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ, करंदी आणि खैरेनगर येथील मॉडेल स्कूलच्या नूतनीकरण व दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारी आणि त्यासंदर्भातील तक्रारींची पुणे जिल्हा परिषदेने गांभीर्याने दखल घ्यावी आणि या सर्व कामांची आधी त्रयस्थ संस्थेकडून (Third party) सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडे केली आहे. 

या मागणीसाठी रवींद्र भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना या मागणीचे निवेदनही दिले. दरम्यान, या निवेदनाची एक प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनाही देण्यात आली आहे. 

शिरूर तालुक्यातील मॉडेल स्कूलच्या कामांच्या दर्जाबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रारी प्राप्त झाल्या असून, यानुसार संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आल्याचे पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी सांगितले. यानुसार संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी कामांचा दर्जा, वापरलेले साहित्य, संबंधित अधिकाऱ्यांची पाहणी तसेच यापूर्वीच्या कामांचा इतिहास यांची वस्तुनिष्ठपणे तपासणी करावी, अशी आमची भूमिका असल्याचे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

या चारही शाळांच्या कामांची पाहणी आणि चौकशी ही जिल्हा परिषद स्तरावर नियुक्त राज्य गुणवत्ता निरीक्षकांमार्फत करण्यात यावी. तसेच काम सुरू असताना संबंधित शाखा अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का, त्यांनी कोणत्या सूचना केल्या होत्या आणि त्या सूचनांची अंमलबजावणी झाली का, याचीही खातरजमा करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, या कामांच्या अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या तरतुदींनुसार साहित्याचा वापर झाला आहे का, साहित्य निर्धारित दर्जाचे आहे का आणि त्याची शासनमान्य प्रयोगशाळेतून तपासणी करण्यात आली आहे का, याची सखोल चौकशी करण्याची सूचना करत,संबंधित कंत्राटदाराने यापूर्वी अन्य विभागांमध्ये केलेल्या कामांबाबत निकृष्ट दर्जाच्या तक्रारी किंवा चौकशी झाली आहे का, याचीही माहिती घेण्यात यावी, अशीही मागणी पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी केली आहे.