Aadaachiwadi development Model:राळेगणसिद्धी, हिवरे बाजार आणि पाटोद्यानंतर पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी ठरले महाराष्ट्रातील ग्रामविकासाचे नवे मॉडेल!

अवघ्या ८५१ लोकसंख्येच्या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पटकावला राज्यात प्रथम क्रमांक : पाच कोटींच्या पारितोषिकाने लोकसहभागाच्या विकासाला मिळाली सरकारी पावती

Aadaachiwadi development Model:राळेगणसिद्धी, हिवरे बाजार आणि पाटोद्यानंतर पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी ठरले महाराष्ट्रातील ग्रामविकासाचे नवे मॉडेल!
पुणे:- आडाचीवाडी (पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा पवार.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. १२ ऑक्टोबर २०२६ :- नऊ डोंगरांच्या कुशीत वसलेले अवघ्या ८५१ लोकसंख्येचे गाव. एकेकाळी पाणीटंचाई, धुळकट रस्ते आणि मर्यादित नागरी सुविधांशी झुंजणारे हे गाव आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी ग्रामविकासाचे नवे मॉडेल ठरले आहे. राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने काम करणारे ग्रामस्थ,गावाच्या विकासासाठी धडपडणारे भूमिपुत्र, शासकीय योजनांना मिळालेली लोकसहभागाची जोड व विकासाबाबतची सामूदायिक इच्छाशक्ती यांच्या बळावर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडीने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, राळेगणसिद्धी आणि छत्रपती संभाजीनगर येथील पाटोदा या तीन गावांनंतर आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यातील अन्य ग्रामपंचायतींसाठी ग्रामपंचायतींसाठी एक नवा आदर्श घालून दिला आहे. 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पहिल्याच वर्षात आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत पाच कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. याआधी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या इतिहासात राळेगणसिद्धी, हिवरे बाजार आणि पाटोदा या गावांनी आपापल्या कामातून स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता त्याच परंपरेत आडाचीवाडीचे नाव जोडले गेले आहे. 

गाव छोटे, पण स्वप्ने मोठी

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी हे गाव भौगोलिकदृष्ट्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेले असून सध्या या गावाची लोकसंख्या ८५१ आहे. यामध्ये ४०२ पुरुष आणि ४४९ महिलांचा समावेश आहे. गावाचा साक्षरता दर ८५.५३ टक्के असून यापैकी एकूण ४६५ कामगार आहेत. या आकडेवारीतून गावाची सामाजिक रचना डोळ्यासमोर येते. मात्र आडाचीवाडीची खरी ताकद आकडेवारीपेक्षा ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांत आहे. गावाचा विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते, दिवे किंवा इमारती उभारणे नव्हे, तर गावातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे, ही भूमिका येथे महत्त्वाची ठरली आहे. 

या गावातील ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका ग्रामस्थांनी स्वीकारली आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर, सामाजिक उत्तरदायित्व निधीची (सीएसआर) जोड व श्रमदानातून होणारी कामे, यामुळे विकासाला गती मिळाली. गावाच्या विकासाची जबाबदारी केवळ ग्रामपंचायतीची नसून प्रत्येक ग्रामस्थाची आहे, ही भावना या वाटचालीचा केंद्रबिंदू ठरल्याचे या गावच्या सरपंच सुवर्णा बजरंग पवार यांनी सांगितले. 

पाणंद रस्त्यांची कोंडी फोडली; शेतकऱ्यांना दिलासा

आडाचीवाडीच्या विकासगाथेतील सर्वांत ठळक व वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे गावातील सर्व १५ पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम हा मुद्दा ठरला आहे. ग्रामीण भागात शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमणे, वहिवाटीचे वाद आणि दळणवळणातील अडचणी हे शेतकऱ्यांसमोरील जुने प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी या प्रश्नांमुळे शेतीमालाची वाहतूक, शेतीची मशागत आणि कृषी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे कठीण होते. आडाचीवाडीने मात्र सामूहिक पुढाकारातून या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि गावातील सर्व १५ पाणंद रस्ते खुले केले. एवढेच नव्हे तर, संबंधित रस्त्यांची महसुली नोंदींमध्ये ‘ग्रामस्थांची वहिवाट’ म्हणून नोंद घेण्यात आली. सर्व या रस्त्यांचे सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात आले असून, त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनालाही महत्त्व देण्यात आले आहे. या कामाचा फायदा केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचणे सुलभ होणे, कृषी यंत्रसामग्रीचा वापर वाढवणे आणि शेतीमाल बाजारपेठेत नेण्यातील अडचणी कमी करणे, असे अनेक फायदे त्यातून अपेक्षित आहेत.

पाण्यासाठीची धडपड ते जलसंधारणाचा शाश्वत प्रयत्न

एकेकाळी दुष्काळी परिस्थितीचा कठीण सामना करणाऱ्या आडाचीवाडीने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले. जलयुक्त शिवार अभियान आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून तलाव, नाले आणि विहिरींच्या दुरुस्ती व खोलीकरणाची कामे करण्यात आली. पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी शासकीय योजनांची मदत घेण्यात आली.

पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत पाणी मुरवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करणे, या प्रयत्नांमुळे गावातील पाणी उपलब्धतेत मोठी सुधारणा झाली आहे.  पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी केवळ सरकारकडे अपेक्षा ठेवण्याऐवजी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेतला, हे या कामाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.ग्रामीण विकासात जलसंधारणाचा परिणाम दूरगामी असतो. पाण्याची उपलब्धता सुधारल्यास शेती, पशुपालन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार मिळतो. त्यामुळे आडाचीवाडीने जलसंधारणासाठी केलेले प्रयत्न हे गावाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात.

प्रत्येक गल्लीला रस्ता, प्रत्येक चौकात प्रकाश

गावाचा विकास नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसला पाहिजे, या भूमिकेतून आडाचीवाडीत पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. भूमिगत गटार व्यवस्था आणि एलईडी पथदिव्यांमुळे स्वच्छता, सुलभ दळणवळण आणि रात्रीच्या वेळी सुरक्षिततेला मदत झाली आहे. गावातील विविध भागांपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गावातील नागरिकांचे आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती लक्षात घेऊन आधुनिक वातानुकूलित व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना विरंगुळ्यासाठी नाना-नानी पार्क विकसित करण्यात आले आहे. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणाही उभारण्यात आली आहे. या सुविधा पाहता, ग्रामीण भागातील विकासाची संकल्पना केवळ मूलभूत गरजांपुरती मर्यादित न राहता आरोग्य, मनोरंजन, पर्यावरण आणि जीवनमान उंचावण्यापर्यंत विस्तारत असल्याचे दिसते.

डिजिटल शाळा आणि वातानुकूलित अभ्यासिका

गावाचा विकास टिकाऊ व्हायचा असेल, तर त्याचा पाया शिक्षणात असला पाहिजे, या उद्देशाने आडाचीवाडी ग्रामपंचायतीने शैक्षणिक सुविधांवरही भर दिला आहे. गावातील शाळेत डिजिटल वर्ग, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावे, हा या प्रयत्नांचा उद्देश आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित, वाय-फाय सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आली आहे. शांत वातावरण, बैठक व्यवस्था आणि अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना गावातच अभ्यासासाठी पोषक जागा मिळाली आहे.

शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांचा काही भाग गावात निर्माण करण्याचा हा प्रयत्न ग्रामीण आणि शहरी भागातील संधींमधील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गावातील तरुणांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधींसाठी अधिक सक्षम बनवण्याची क्षमता या सुविधांमध्ये आहे.

भूमिपुत्राचा पुढाकार, ग्रामस्थांचे श्रमदान

आडाचीवाडीच्या विकासात या गाव चे सुपुत्र संदेश शिर्के यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जाते. ते रायगड येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासकीय योजनांची सांगड सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाशी घालून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, कोणत्याही गावाचा विकास एका व्यक्तीच्या प्रयत्नांवर पूर्ण होत नाही. त्यासाठी स्थानिक नेतृत्व, ग्रामपंचायतीचे नियोजन, प्रशासनाचे सहकार्य आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. आडाचीवाडीच्या बाबतीतही सामुदायिक सहभाग हा महत्त्वाचा ठरला आहे. गावातील लोकांनी सार्वजनिक सुविधांकडे केवळ शासनाने दिलेली साधने म्हणून न पाहता त्यांची देखभाल आणि जपणूक करण्याची जबाबदारीही स्वीकारली, तर अशा कामांचे दीर्घकालीन फायदे अधिक व्यापक होऊ शकतात, हेच या गावातील ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

पुरस्कारापलीकडचा विकासाचा अर्थ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे आणि पाच कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाल्याची माहिती ही आडाचीवाडी गावासाठी मोठी अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. या गौरवामुळे गावाच्या विकासकामांना राज्यस्तरावर ओळख मिळाली आहे. मात्र, पुरस्कार ही विकासाची अंतिम लक्ष्य नसून पुढील प्रगतीसाठी मिळालेली मोठी प्रेरणा आहे.

या पारितोषिकाचा विनियोग गावाच्या दीर्घकालीन गरजांसाठी, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती व पर्यावरण संवर्धन यांसारख्या क्षेत्रांत नियोजनपूर्वक करता येणार आहे. ग्रामस्थांचा सहभाग आणि पारदर्शक नियोजन कायम राहिल्यास या गौरवाचे रूपांतर अधिक व्यापक विकासात होऊ शकते.

आडाचीवाडीची यशोगाथा सांगताना राळेगणसिद्धी, हिवरे बाजार आणि पाटोदा या गावांची आठवण करणेही अपरिहार्य ठरते. या गावांनीही लोकसहभाग, जलसंधारण, सामाजिक परिवर्तन आणि ग्रामविकासाच्या विविध प्रयोगांतून महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला आहे. आडाचीवाडीची वाटचाल त्याच व्यापक परंपरेतील नवे उदाहरण म्हणून पाहता येत आहे. 

राज्यातील अन्य ग्रामपंचायतींसाठी आडाचीवाडीचा संदेश

महाराष्ट्रातील अनेक गावांना आजही पाणीटंचाई, रस्ते, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार आणि शेतीविषयक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. उपलब्ध शासकीय योजनांचा योग्य वापर, स्थानिक गरजांनुसार विकासाचे नियोजन आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यांची सांगड घातल्यास या प्रश्नांवर मार्ग काढता येऊ शकतो, असा संदेश या पुरस्काराच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यातील अन्य ग्रामपंचायतींसाठी दिला आहे. कारण या गावाची लोकसंख्या मोठी नाही. आर्थिक साधनेही अमर्याद नाहीत. तरीही सामुदायिक  इच्छाशक्ती, स्थानिक नेतृत्व व विकासासाठीची बांधिलकी यांच्या मदतीने गावात लक्षणीय बदल घडवता येतात, हेच यातून आडाचीवाडीने दाखवून दिले आहे.

राळेगणसिद्धीने सामाजिक परिवर्तनाची, हिवरे बाजार या गावाने जलसंधारण व ग्रामविकासाची, तर पाटोदाने लोकसहभागातून गाव बदलण्याची प्रेरणा दिली. आडाचीवाडीने पाणंद रस्ते खुले करणे, पायाभूत सुविधा उभारणे, जलसंधारण, शिक्षण आणि सार्वजनिक सुविधांचा विकास या कामांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.