Zilla Parishad election counting : राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची येत्या सोमवारी मतमोजणी व निकाल!

सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार : दुपारी बारा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येणार

Zilla Parishad election counting : राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची येत्या सोमवारी मतमोजणी व निकाल!
पुणे:- जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणी

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ८ फेब्रुवारी २०२६ :- महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ही येत्या सोमवारी (दि.९ फेब्रुवारी) केली जाणार आहे. यावेळी मतमोजणीनंतर लगेचच निकालही जाहीर केले जाणार आहेत. ही मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजता आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी केली जाणार आहे. दुपारी १२  वाजेपर्यंत जिल्हा परिषदेचा पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

यामध्ये पुणे जिल्हा परिषदेसह पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या मतमोजणीचाही समावेश आहे. जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची मतमोजणी ही पुणे शहरात केली जाणार आहे. उर्वरित १२ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ही आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी केली जाणार आहे. या मतमोजणीची ठिकाणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निश्चित करुन दिली आहेत. 

राज्यातील पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli), सोलापूर (Solapur), कोल्हापूर (Kolhapur), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), परभणी (Parbhani), धाराशिव (Dharashiv) आणि लातूर (Latur) या बारा जिल्हा परिषदा आणि या जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रातील १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान झाले आहे. 

पुणे झेडपीची मतमोजणी कोठे होणार? 

१) जुन्नर :- श्री लेण्याद्री गणपती भक्त निवास भाग क्र. 2, गोळेगाव, ता. जुत्रर.

२) आंबेगाव :- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, अवसरी खुर्द, ता. आंबेगाव. 

३) शिरूर :- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम,  रांजणगाव एमआयडीसी कारेगाव, ता. शिरूर.

४) खेड :- हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल, तिन्हेवाडी, ता. खेड. 

५) मावळ :- तहसील कार्यालय मावळ (वडगाव), नवीन इमारत, ता. मावळ.

६) मुळशी :- राणी लक्ष्मीबाई मुलीची सैनिक शाळा, कासार अंबोली, येथील सभागृह, ता. मुळशी. 

७) हवेली:- सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सेंट्रल लायब्ररीसमोर, आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली. 

८) दौंड :- शासकीय धान्य गोदाम, नगरमोरी चौक, दौंड.

९) पुरंदर :- नवीन प्रशासकीय इमारत (तळमजला), सासवड, ता. पुरंदर.

१०) वेल्हे (राजगड) :-शासकीय धान्य गोदाम, राजगड (वेल्हे), ता. राजगड.

११) कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मांढरदेवी रोड, भोर.

१२) बारामती :- जिल्हा क्रिडा संकुल बॅडमिंटन हॉल, बारामती.

१३) इंदापूर :- शासकीय धान्य गोदाम, कालठण रोड, इंदापूर.