कुटुंबची कुटुंबं उद्ध्वस्त करणाऱ्या नियोजित कला केंद्राला विरोध करण्यासाठी खास ग्रामसभा : ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे गावकऱ्यांचे आवाहन 

पुणे जिल्ह्यातील पेमदऱ्यात आला 'गाव करील, तेथे राव काय करील', या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव

कुटुंबची कुटुंबं उद्ध्वस्त करणाऱ्या नियोजित कला केंद्राला विरोध करण्यासाठी  खास ग्रामसभा : ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे गावकऱ्यांचे आवाहन 
पुणे:- ग्रामपंचायत कार्यालयाचे ए. आय‌. ने तयार केलेले छायाचित्र.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२५ :- पुणे जिल्ह्यातील पेमदरा (ता. जुन्नर) हे जुन्नर तालुक्याच्या सीमेवर वसलेले एक गाव आहे. जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पुनित झालेला तालुका आहे. या गावातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना विश्वासात न घेताच कला केंद्र उभारण्यासाठीचा ठराव केल्याची खबर जागरूक गावकऱ्यांना लागली आणि या कला केंद्रांमुळे भविष्यात गावातील कुटुंबेची कुटुंब उद्ध्वस्त होतील.त्यामुळे याला आत्ताच विरोध केला पाहिजे, या उद्देशाने हे जागरुक नागरिक पेटून उठले आणि या नियोजित कला केंद्राला तीव्र विरोध करण्यासाठी मुळचे पेमदराकर पण नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबईत स्थायिक झालेल्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. 

या केंद्राला विरोध करण्यासाठी सरकारी दरबारी प्रयत्न आणि सातत्याने पाठपुरावा विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला अखेर यश आले आणि ही विशेष ग्रामसभा घेण्यासाठी या गावकऱ्यांना अखेर परवानगी मिळाली. यानुसार येत्या बुधवारी (दि.१३ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता पेमदरा गावात ही विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे‌. यामुळे गाव करील, तेथे राव काय करील, या म्हणीचा प्रत्यय आला आहे. पुणे, मुंबईत स्थायिक झालेल्या पेमदरावासियांनी आणि गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे. 

गावात कला केंद्र सुरू करण्यास मुंबईकर, पुणेकर व स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आपला सर्वांचा हा विरोध दाखविण्यासाठी तसेच कला केंद्र बंद व्हावे यासाठी " विशेष ग्रामसभा" बोलावण्यात यावी, यासाठी वेगवेगळ्या स्तरावर निवेदन दिल्यानंतर बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता विशेष ग्रामसभेबाबतची  नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेस मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. या सभेत ग्रामपंचायत व प्रशासन पातळीवर कला केंद्र बंद करणेबाबत निर्णय घेण्यात यावा. अन्यथा या विरोधात सर्व ग्रामस्थ तीव्र आंदोलन उभे करतील आणि यासाठी ग्रामपंचायतीचे कार्यकारी मंडळ व प्रशासन जबाबदार असेल, असे ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.