Pune Zp Supplementary Budget : पुणे जिल्हा परिषदेचे येत्या सोमवारी (दि. २७ जुलै) पुरवणी अंदाजपत्रक!
जिल्हा परिषदेची सोमवारी सर्वसाधारण सभा : नवीन पदाधिकारी आणि सदस्यांचे पहिलेच पुरवणी अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर होणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ जुलै २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या चालू आर्थिक वर्षाचे (सन २०२६-२७) पुरवणी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी चार महिन्यांपुर्वी दिलेल्या सुचनांच्या आधारे तयार करण्यात आलेले हे पुरवणी अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे.
हे पुरवणी अंदाजपत्रक सादर करुन, त्यास मंजुरी घेण्यासाठी येत्या सोमवारी (दि. २७ जुलै) जिल्हा परिषदेची सर्वंसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक हे दि. १७ मार्च २०२६ रोजी प्रशासकांनी सादर केले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे सभागृह अस्तित्वात नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. १८ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे सभागृह अस्तित्वात आले आहे. या तांत्रिक कारणामुळे या अंदाजपत्रकात नवीन झेडपी सदस्यांना आपापल्या सूचना मांडता आल्या नव्हत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी नवीन सदस्यांकडून जिल्हा परिषदेच्या चालू आर्थिक वर्षाच्या पुरवणी अंदाजपत्रकात कोणत्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे, याबाबत आपापल्या लेखी सूचना मागविल्या होत्या. या नवीन जिल्हा परिषद सदस्यांच्या सुचनांच्या आधारे हा पुरवणी अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्रशासक गजानन पाटील यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात कृत्रीम बुद्धिमत्ता (ए.आय.), सायन्स पार्कची उभारणी, कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे, सोलर पार्कची निर्मिती करणे, सामुदायिक अक्षय उर्जा केंद्र उभारणे, मॉडेल स्कूल व मॉडेल आरोग्य केंद्र निर्माण करणे, अनुभव केंद्र व जिल्हा डेटा सेंटरची उभारणी करणे, पिंक रुमची उभारणी करणे, घे भरारी, फिरते शॉपी योजना आणि सावित्री कॅफेची आदींसह विविध ३० नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे.
पायाभूत सुविधा आणि लोकाभिमुख योजनांवर भर - वीरधवल जगदाळे
दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी, युवक, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि मागास घटकातील सर्व ग्रामस्थांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि लोकाभिमुख योजना व उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. यानुसार मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो, नासा यांसारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये अभ्यास दौरे आयोजित करणे, शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, जिल्ह्यातील दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते दुरुस्ती, रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करणे आदी कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
