Pune Zilla Parishad election 2026 : पुणे झेडपी, पंचायत समित्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे दोन दिवस!
गाव पुढाऱ्यांमध्ये मोठा निरुत्साह : झेडपी, पंचायत समित्यांच्या २१९ जागांसाठी तीन दिवसांत अवघे ६२ उमेदवारी अर्ज दाखल
डॉ. गजेंद्र बडे: ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १९ जानेवारी २०२६ :- तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर यंदा होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकी गाव पुढाऱ्यांमध्ये मोठा निरुत्साह दिसून येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समित्यांच्या १४६ मिळून २१९ जागांसाठी गेल्या तीन दिवसात अवघ्या ५८ इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे येत्या मंगळवारी (दि.२० जानेवारी) आणि बुधवारी (दि.२१ जानेवारी) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यासह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि.१९ जानेवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस होता. या तिसऱ्या दिवसांच्या अखेरपर्यंत एकूण ५८ इच्छुकांनी मिळून ६२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठीच्या २८ तर, जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठीच्या ३० जणांचा समावेश आहे. जिल्हा परिषद गटांसाठी २८ जणांनी ३० तर, पंचायत समित्यांच्या गणांसाठी ३० जणांनी ३२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आजतागायत दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांपैकी जिल्हा परिषद गटांसाठी पहिल्या केवळ एक, दुसऱ्या दिवशी चार तर, सोमवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत समित्यांच्या ३२ अर्जांपैकी पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी तीन आणि तिसऱ्या दिवशी २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
तीन दिवस तब्बल ३३४२ उमेदवारी अर्जांची विक्री
दरम्यान, गेल्या तीन दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण तब्बल ३ हजार ३४२ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. यापैकी जिल्हा परिषद गटांसाठीच्या १ हजार ४३२ तर, पंचायत समित्यांच्या गणांसाठीच्या १ हजार ९१० उमेदवारी अर्जांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषद निवडणूक समन्वयक व रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारूशीला देशमुख-मोहिते यांनी सोमवारी सांगितले.
