Pune Zilla Parishad election 2026 : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या २१९ जागांसाठी १८०६ जणांचे २३३५ उमेदवारी अर्ज दाखल!
इंदापूर तालुक्यात सर्वाधिक तर, वेल्हे तालुक्यात सर्वात कमी अर्ज : उमेदवारी अर्जांची छाननी सुरु
डॉ. गजेंद्र बडे: ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २२ जानेवारी २०२६ :- तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर यंदा होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१९ जागांसाठी १८०६ जणांनी तब्बल २३३५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज इंदापूर तर, सर्वात कमी अर्ज वेल्हे तालुक्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि.२२ जानेवारी) सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी करण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समित्यांच्या १४६ मिळून २१९ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि. १६ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. काल (बुधवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. पहिल्या तीन दिवसात अवघ्या ५८ इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यानंतरच्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छुकांची मोठी झुंबड उडाली होती.
दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांमध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठीच्या ८५३ तर, जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठीच्या १४८२ अर्जांचा समावेश आहे. जिल्हा परिषद गटांसाठी ६४१ जणांनी ८५३ तर पंचायत समित्यांच्या गणांसाठी ११६५ जणांनी १४८२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषद गटांसाठी ३७४ पुरुष तर, २६७ महिलांनी तर, पंचायत समित्यांसाठी ६४४ पुरूष आणि ५२१ महिलांनी उमेदवारी अर्ज केले असल्याचे जिल्हा परिषद निवडणूक जिल्हा समन्वयक व रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी सांगितले.
निवडणूक कर्मचारी रात्री दोन वाजेपर्यंत आकड्यांसाठीचा गड लढवत होते
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मोठी झुंबड उडाली उडाली होती. अनेक तालुक्यांत कालच्या फक्त एका दिवसात सुमारे तीनशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले. किती उमेदवारी अर्ज दाखल झाले, याची माहिती रोजच्या रोज निवडणूक आयोगाला कळवावी लागते. यामुळे जिल्हा निवडणूक कार्यालयातील कर्मचारी हे तालुकानिहाय उमेदवारी अर्जांचे आकडे मिळवून, त्याचा अहवाल तयार करण्यासाठी रात्री दोन वाजेपर्यंत गड लढवत होते. यामुळे जिल्हा निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी रात्रीचे तीन वाजले.
