Zilla Parishad Election Vote Counting : ... अशी होणार पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी!

मोजणीसाठी तब्बल ३२१ टेबल असणार  : जिल्ह्यात मिळून एकूण २११ फेऱ्या होणार

Zilla Parishad Election Vote Counting : ... अशी होणार पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ९ फेब्रुवारी २०२६ :- पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी ही एकूण ३२१ टेबलवर आणि २११ फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने या मत मोजणीसाठी तालुकानिहाय मोजणीसाठीच्या टेबलची आणि फेऱ्यांची संख्या रविवारी (दि‌.८ फेब्रुवारी) निश्चित करुन दिली आहे.

यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक ३२ फेऱ्यांमध्ये इंदापूर तालुक्यातील तर, सर्वात कमी  केवळ आठ फेऱ्यांमध्ये वेल्हे तालुक्यातील गट आणि गणांची मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३२ टेबलवर जुन्नर तालुक्यातील मतांची मोजणी केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागाच्या जिल्हा समन्वयक आणि रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारूशीला देशमुख-मोहिते यांनी सांगितले. 

पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या मिळून एकूण १४६ गणांच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि‌‌. ७ फेब्रुवारी) रोजी मतदान झाले आहे. सर्व गट आणि गणांच्या मिळून एकूण २१९ जागा आहेत. या सर्व जागांसाठी एकूण ८२७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी २९९ तर, पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी ५२८ उमेदवारांचा समावेश आहे. 

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील सर्व गट आणि गणांची मतमोजणी एकूण ३२१ टेबलवर केली जाणार आहे. यापैकी २७७ टेबल हे ईव्हीएम मशीनमधील मते तर, ४४ टेबल हे टपाली मते (पोस्टल बॅलेट) मोजणीसाठी वापरली जाणार आहेत. या सर्व टेबलवर मिळून मतमोजणीच्या एकूण २११ फेऱ्या केल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ३२ फेऱ्या या इंदापूर तर, सर्वात कमी म्हणजेच केवळ आठ फेऱ्या या वेल्हे तालुक्यात केल्या जाणार आहेत.

सर्वात आधी वेल्हे तालुक्याची मतमोजणी संपणार

वेल्हे तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ दोन गट आणि चार गण आहेत. या सर्व गट व गणांची मतमोजणी ही एकाचवेळी १६ टेबलवर केली जाणार आहे. ही मतमोजणी आठ फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील मतमोजणी सर्वात आधी संपणार असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे. 

पुणे जिल्हा परिषद मतमोजणी दृष्टीक्षेपात....!

- पुणे जिल्हा परिषदेचे एकूण गट --- ७३. 
- तेरा पंचायत समित्यांचे एकूण गण --- १४६. 
- पुणे जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र --- ३६०५
- मतमोजणीसाठी एकूण टेबल --- ३२१. 
- टपाल मतमोजणीसाठीचे टेबल --- ४४. 
- मतमोजणीच्या केल्या जाणाऱ्या एकूण फेऱ्या --- २११.
- मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले एकूण कर्मचारी --- २१६६. 
- तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी --- २२८५.

तालुकानिहाय मतमोजणी टेबल (कंसात टपाली मतपत्रिका मोजणी टेबलची संख्या) 

- जुन्नर --- ३२ (०८). 
- आंबेगाव --- २० (०५).
- शिरूर --- २८ (०१). 
- खेड --- १६ (०२). 
- मावळ --- २० (०५). 
- मुळशी --- १७ (०२).
- हवेली --- २४ (०१). 
- दौंड --- २१ (०७). 
- पुरंदर --- २१ (०४). 
- वेल्हे --- १६ (०१). 
- भोर --- २० (०४). 
- बारामती --- २८ (०२). 
- इंदापूर ---  १४ (०२) 

तालुकानिहाय मतमोजणी फेऱ्या 

- जुन्नर --- १२.
- आंबेगाव --- १५.
- शिरूर --- १४. 
- खेड --- ३१. 
- मावळ --- १७.
- मुळशी --- १५.
- हवेली --- १४.
- दौंड --- १७. 
- पुरंदर --- ११.
- वेल्हे --- ०८. 
- भोर --- १३. 
- बारामती --- १२. 
- इंदापूर --- ३२.