PWD  paid tribute to Ajit Pawar : भविष्यातील सर्व शासकीय प्रकल्पांचे दर्जेदार काम करणे, हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली!

पुणे कॉन्ट्रॅक्टरअसोसिए‌शनचे अध्यक्ष रविंद्र भोसले : सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे अजित पवार यांना श्रद्धांजली 

PWD  paid tribute to Ajit Pawar : भविष्यातील सर्व शासकीय प्रकल्पांचे दर्जेदार काम करणे, हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली!
पुणे:- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ९ फेब्रुवारी २०२६ :- महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विकासकामे ही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व्हावीत, यावर कटाक्ष असायचा. त्यामुळे विविध विकासकामांना ते भेट देऊन पूर्ण झालेल्या कामाची बारकाईने पाहणी करत असत. चांगले गले काम केलेल्या कंत्राटदारांचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे कौतुक केले आहे. त्यामुळे यापुढील सर्व शासकीय विकासकामे ही दर्जेदार पूर्ण करणे, हीच खरी अजित पवार यांना  श्रद्धांजली ठरेल, असे मत पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी येथे बोलताना व्यक्त केले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना भोसले बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधिक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर व सुनील माळी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या श्रद्धांजली सभेत बोलताना मुख्य अभियंता रहाणे व अधिक्षक अभियंता बाविस्कर यांनी अजित पवार यांच्यामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या इमारतीचे बांधकाम व विविध प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात अजूनही अनेक प्रकल्प हाती घेतले असून हे सर्व प्रकल्प हे दर्जेदार झाले पाहिजेत, यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न होता. प्रत्येक प्रकल्पाला ते आवर्जून भेट देऊन अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना सूचना देत असत. तसेच प्रत्येक प्रकल्पावेळी नवीन वृक्षांची लागवड करून ते जोपासण्याचा सल्ला देत असत. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या रस्त्यांच्या कामांसाठी अजित पवार यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता, अशी आठवणही रहाणे व बाविस्कर यांनी यावेळी सांगितली. 

कार्यकारी अभियंता अमोल पवार व उज्वला घावटे यांनी अजित पवार यांचे तांत्रिक ज्ञान हे एखाद्या अभियंत्यापेक्षा कमी नव्हते. त्यांना बांधकामामधील बारकावेसुद्धा ज्ञात होते व त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाला आवर्जून भेट देऊन सूचना व सल्ले देत असत. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे आता कोणाचा सल्ला घ्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कोणत्याही नवीन रस्त्यांचे किंवा प्रकल्पाचे नियोजन करताना पुढील ५० वर्षांचा विचार करुन ते पूर्ण करण्याच्या सूचना पवार देत असत, असेही पवार व घावटे यांनी सांगितले. या श्रद्धांजली सभेचे नियोजन अनिल बडे आणि अनिल काकडे यांनी केले. केतन ठाणगे यांनी सूत्रसंचालन केले.