Katraj Dairy's milk rate increaseed : पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना गणेशोत्सवाची ‘गोड’ बातमी : दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ!
पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचा निर्णय : येत्या शुक्रवारपासून (दि. ११ सप्टेंबर) नवे दर लागू होणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ९ सप्टेंबर २०२६ :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय बुधवारी (दि.९ सप्टेंबर) घेतला आहे. पशुखाद्य, वैरण आणि वाहतूक खर्चात झालेली मोठी वाढ लक्षात घेऊन गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ येत्या शुक्रवारपासून (दि. ११ सप्टेंबर २०२६) लागू केली जाणार असल्याचे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी सांगितले.
दरम्यान, दूध उत्पादकांना वाढीव दर देताना ग्राहकांवर मात्र कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी दूध विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा अधिक चांगला मोबदला मिळणार असून, दुसरीकडे ग्राहकांसाठी दूध दर कायम राहणार आहेत. नवीन दरानुसार ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ४० रुपये ८० पैसे, तर, ६.० फॅट व ९.० एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५४ रुपये असणार आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी, दुग्ध व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने पुणे जिल्हा दूध संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. या दरवाढीमुळे पुणे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असल्याचे चांभारे यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना आधार, ग्राहकांवर भार नाही
दूध खरेदी दरातील ही वाढ केवळ दरवाढ नसून दूध पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य देण्याचा प्रयत्न असल्याचे दूध संघाकडून सांगण्यात आले. विशेषतः सध्या पशुखाद्य, वैरण, इंधन आणि वाहतूक खर्च वाढल्याने दूध उत्पादनाचा खर्चही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वाढीव खरेदी दरामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे. याचवेळी ग्राहकांसाठी दूध विक्री दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ‘शेतकऱ्यांना वाढीव दर व ग्राहकांना स्थिर दर’ अशी दुहेरी भूमिका संघाने घेतली आहे.
दर्जेदार दुधाच्या पुरवठ्याचे आवाहन
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा दूध संघाला स्वच्छ, ताजे, भेसळविरहित आणि उच्च गुणवत्तेच्या दुधाचा पुरवठा करावा,असे आवाहन संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी केले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे दूध उपलब्ध करून देतानाच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी संघ कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
