PDCC Excellent Bank Award :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 'नाबार्ड'तर्फे 'उत्कृष्ट जिल्हा बँक' पुरस्काराने गौरव!

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान : सर्वोत्कृष्ट कामगिरीची दखल 

PDCC Excellent Bank Award :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 'नाबार्ड'तर्फे 'उत्कृष्ट जिल्हा बँक' पुरस्काराने गौरव!
पुणे:- केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार स्वीकारताना बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २२ जुलै २०२५ :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी)उत्कृष्ट कामगिरीची राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने(नाबार्ड) दखल घेतली आहे. यासाठी 'नाबार्ड'ने 'पीडीसीसी'ला उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्काराने गौरविले आहे. नाबार्डच्या स्थापनादिनी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुणे जिल्हा बँकेला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी नाबार्डच्या स्थापनादिनी विविध पुरस्कार देण्यात येतात. यंदा नाबार्डचा ४४ वा स्थापना दिन होता.हा स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाबार्डच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात जिल्हा बँकेला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

पुणे जिल्हा बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये केलेले कामकाज विचारात घेऊन  गुणवत्तेच्या आधारे नाबार्डने राज्यातील "Best Performance in DCC" बॅंक या पुरस्कारासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसची निवड केली आहे. पुणे ही देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची व्यावसायिक उलाढाल असणारी बॅंक आहे. शिवाय पहिल्या ५ क्रमांकामध्ये असणाऱ्या अर्बन शेडयूल्ड सहकारी बँकांशी तुलना करता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अग्रगण्य स्थान प्राप्त केले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये ठेवी,कर्ज,व्यवसायिक उलाढाल, वसुली,स्वनिधी,नफा, नेटवर्थ,ठेवी,कर्जे, एन.पी.ए. वसुली, प्रोव्हिजन कव्हरेज रेशो आदी सर्व आघाड्यांवर ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी सांगितले.

दरम्यान,बँकेच्या संलग्न विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सभासदांच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील व्याज सवलत आणि व्याज परताव्याची माहिती केंद्र शासनाच्या के.आर.पी. पोर्टलमध्ये वेळेत सादर करणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली आहे. याबद्दल जिल्हा बॅंकेला देशपातळीवर गौरविण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला  बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे,उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई आदी उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या या कामगिरीमध्ये बँकेचे ग्राहक, शेतकरी, सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्ग हे सर्वजण अधिक उत्साहाने काम करतील व बँकेच्या नावलौकिकास आणखी वाव मिळेल.

- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बॅंक, पुणे.