Junnar Gold' mango developed by a farmer from Junnar taluka gets patent :- जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याने विकसित केलेल्या 'जुन्नर गोल्ड' आंब्याला मिळाले पेटंट
वैष्णवधाम येथील शेतकरी भरत जाधव यांचे यश : लखनौ विद्यापीठाचे पेटंट
दत्ता म्हसकर : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ४ डिसेंबर २०२५ :- पुणे जिल्ह्यातील वैष्णवधाम (ता. जुन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेल्या “जुन्नर गोल्ड” या आंब्याच्या नवीन वाणाला लखनौ विद्यापीठामार्फत गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) पेटंट मिळाले आहे. जुन्नरचे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी ही माहिती दिली.
राज्याचा कृषी विभाग आणि नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिल्ली येथून लखनौ विद्यापीठाकडे 'प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अँड फार्मसी राईट्स अथॉरिटी' याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या लखनौ येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. रवि प्रकाश, डॉ. विनीत सिंग यांनी प्रत्यक्ष पाहणी करून झाडाची पाने व फळे यांचे नमुने तपासले होते. या तपासणीनंतर आणि आवश्यक सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर गुरुवारी या वाणाला अधिकृत मान्यता (पेटंट) देण्यात आली आहे.भरत जाधव या प्रयोगशील शेतकऱ्याच्या संशोधनबाबत परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
हा नवीन वाण विकसित करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागातील विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफीक नायकोडी, कृषी आयुक्तालयातील नियोजन विभागाचे संचालक विनय आवटे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रेय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, खेडचे उपविभागीय कृषी अधिकारी, सतीश शिरसाट, कृषिरत्न पुरस्काराचे मानकरी शेतकरी अनिल मेहेर, कृषिभूषण जितेंद्र बिडवई ,जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ प्रशांत शेटे,शास्त्रज्ञ भरत टेमकर, कृषी अधिकारी बापू रोकडे, मंडळ कृषी अधिकारी प्रतीक्षा धायगुडे, भाऊसाहेब बोकड, गणेश धाडवड, सौ. अनिता वाघुले ,भारती मडके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या नवीन वाणाची वैशिष्ट्ये
- नियमित फाळधारणा होते.
- एका फळाचे वजन ८०० ते ९०० ग्राम.
- फळांचा रंग बाहेरून पिवळा व आतून केशरी.
- चव हापूस, केशर व राजपुरी मिश्रित.
