पुणे जिल्ह्यातील इतक्या शेतकऱ्यांना मिळाला रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्जाचा लाभ?, आतापर्यंत ५५१ कोटींचे पीककर्ज वाटप

शेतकऱ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत पीक कर्ज घेता येणार : पुणे जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना फायदा 

पुणे जिल्ह्यातील इतक्या शेतकऱ्यांना मिळाला रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्जाचा लाभ?, आतापर्यंत ५५१ कोटींचे पीककर्ज वाटप
जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २३ मार्च २०२५ :-  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी आज अखेरपर्यंत ( दि.२३)  एकूण ५५१ कोटी ५९ लाख ९२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. या कर्ज वाटपाचा जिल्ह्यातील ६८ हजार १० शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना आणखी येत्या ३१ मार्चपर्यंत रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप केले जाणार आहे. 

रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना  कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ८०.४४ टक्के इतके पूर्ण झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बँकेच्या वतीने प्रत्येकी कमाल ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने देण्यात येते. जिल्हा बॅंकेच्यावतीने मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित करण्यात येत होते. मात्र मागील तीन वर्षापुर्वी  केंद्र सरकारने व्याज परताव्यावरील सवलतीत अर्ध्या टक्क्याने कपात केलेली आहे. त्यामुळे शून्य टक्के व्याजाची ही योजना गोत्यात आली होती. परंतु राज्य सरकारच्या सुचनेनुसार या अर्धा  टक्क्याचा फरकाचा भार उचलण्याची तयारी राज्य सहकारी बँकेने दर्शविली आहे. 
 
जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने ६८५ कोटी ७३  लाख  रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट यंदाचा रब्बी हंगाम संपेपर्यंतचे आहे. एकूण उद्दिष्टांपैकी आतापर्यंत यापैकी ८०.४४ टक्के  उद्दिष्ट  पूर्ण झाले असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रब्बी पीक कर्ज दृष्टीक्षेपात...

रब्बीसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ---  ६८५ कोटी ७३ लाख रुपये
आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप --- ५५१ कोटी ५९  लाख ९२  हजार रुपये
पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी --- ६८ हजार १० 
पीक कर्जाचा लाभ झालेले शेतीचे एकूण क्षेत्र --- ४८ हजार ९७५ हेक्टर
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील आजअखेरचे वाटप --- ५७९ कोटी ७९ लाख ०१ हजार रुपये

पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून एकूण दोन हजार ७२४ कोटी ६६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी खरिपासाठीचे उद्दिष्ट हे २ हजार ४३ कोटी ४३ हजार रुपयांचे आहे. या पीक कर्ज वाटप उपक्रमांतर्गत मागेल त्या पात्र शेतकऱ्याला लाभ दिला जात आहे. कर्जाची मागणी केलेला एकही पात्र शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा बॅंक सातत्याने घेत आहे.

- प्रा. डॉ .दिगंबर दुर्गाडे,
अध्यक्ष,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे.