गुटख्याच्या धर्तीवर 'अॅनालॉग चीज'वर (बनावट पनीर) बंदी घाला, दूध भेसळानांही धडा शिकवा, हे का करणं गरजेचे, ते पहा
राज्यातील खासगी व दूध संघांचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना साकडं : ... तर कारखाने उद्ध्वस्त करणार
गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० मार्च २०२५ :- राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या महानगरांमध्ये अॅनालॉग चीज'ने धुमाकूळ घातला आहे. अॅनालॉग चीज हे पनीर नसूनही काही बोगस कारखानदार यांची पनीर म्हणून सर्रास विक्री करु लागले आहेत. या भेसळयुक्त पनीरमुळे मानवी जीवन आणि पर्यायाने खरे पनीर निर्माण करणारे खासगी व सहकारी दूध उत्पादक संघ अडचणीत आले आहेत. त्यामुळे दूध आणि पनीरमध्ये भेसळ करणाऱ्यांना कायमस्वरूपी धडा शिकवा आणि यासाठी महाराष्ट्रात गुटख्याच्या धर्तीवर अॅनालॉग चीज'वर कायमस्वरूपी बंदी घाला, असे साकडे राज्यातील खासगी व सहकारी दूध उत्पादक संघांनी गुरुवारी (दि. २० मार्च) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना घातले.
राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग हा लवकरच दूध व पनीरमध्ये भेसळ करणाऱ्यांना धडा शिकवेल. यासाठी प्रसंगी बनावट पनीरचे कारखाने उद्ध्वस्त केले जातील, असे आश्वासन यावेळी मंत्री नरहरी झिरवळ यांनी दूध उत्पादक संघांच्या प्रतिनिधींना दिले आहे .
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राज्यात दूध, तुप व पनीर भेसळीच्या घटना उघडकीस येत आहेत. तुपात वनस्पती तेलाची भेसळ केली जात आहे. पनीर म्हणून अॅनालॉग चीज'ची सर्रास विक्री केली जात आहे. शिवाय दुधामध्ये युरिया किंवा तत्सम पदार्थांची भेसळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दूध उत्पादक संघाच्या प्रतिनिधींनी गुरुवारी (दि.२० मार्च) मंत्रालयात जाऊन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन, त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली .
यावेळी दूध व दुग्धजन्य पदार्थांची नियमित तपासणी करण्याची व्याप्ती वाढवावी, अॅनालॉग चीजची खरेदी करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांची नावे जाहीर करावीत,
दुधाच्या भेसळीसंदर्भात कडक तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या बैठकीला मंत्री नरहरी झिरवळ, राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर, आमदार मोनिका राजळे,
एस. आर. थोरात दूध चे रामराव थोरात, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) उपाध्यक्ष मारुती जगताप, दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के, गोविंद दूधचे डॉ.गणेश सपकाळ, ऊर्जा दूधचे प्रकाश कुतवळ आदी उपस्थित होते.
अॅनालॉग आणि पनीरमध्ये काय फरक
अॅनालॉग हे पनीर नसून ते चीज आहे. चीज हा पदार्थ दुधापासून तयार केला जात नाही. याउलट शुद्ध पनीर हे गाईच्या किंवा म्हशीच्या शुद्ध दुधापासून तयार करण्यात येते. त्यामुळे अॅनालॉग हे पनीर नसून ते चीज असल्याने ते बनावट पनीर आहे.
.... तरीही हॉटेल व्यावसायिक अॅनालॉग चीज का खरेदी करतात?
बाजारात शुद्ध पनीरचा दर हा प्रति किलो ४०० रूपये इतका आहे. याउलट अॅनालॉग चीज हे प्रति किलो १६० रूपयांनी मिळत असते. अॅनालॉग चीज हे शुद्ध पनीरच्या तुलनेत खुपच दराने म्हणजे खुपचं स्वस्त मिळत असल्याने अधिकाधिक नफा कमाविण्याच्या उद्देशाने हॉटेल व्यावसायिक हे जाणीवपूर्वक अॅनालॉग चीजची खरेदी करत असतात.
सध्या हॉटेलमध्ये आपण जे पनीर खातो, ते शुद्ध पनीर नसून प्रत्यक्षात ते अॅनालॉग चीज आहे. यामुळे पनीर खाणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होत आहे. यातून आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. हे टाळण्यासाठी बनावट पनीरवर कायमस्वरूपी बंदी घालणे आवश्यक आहे .
- प्रकाश कुतवळ,सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य.
