Onions brought tears to the eyes of farmers : शेतकऱ्याला साडेसात क्विंटल कांद्याच्या विक्रीतून मिळाले फक्त ६६४ रूपये! 

कांदा पिकाला प्रती एकरी ६६ हजार रुपये खर्च अन् ६५ हजार रुपयांचा तोटा : शेतकऱ्यांनी जगायचं कसं? 

Onions brought tears to the eyes of farmers : शेतकऱ्याला साडेसात क्विंटल कांद्याच्या विक्रीतून मिळाले फक्त ६६४ रूपये! 
पुणे :- पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याला साडेसात क्विंटल कांदा विक्रीतून मिळालेल्या ६६४ रुपायांची आडत दुकानाची पावती.

डॉ. गजेंद्र बडे ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १६ ऑक्टोबर २०२५ :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था 'आई जेऊ घालीना, बाप भिक मागू देईना' या उक्तीप्रमाणे झाली आहे. शेतकरी कधी दुष्काळाने होरपळतो तर, कधी अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास हिरावला जात आहे. यंदा आधीच अतिवृष्टीमुळे शेती व पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यातच आता कांदा पिकाला प्रति किलो केवळ ८९ पैशांचा भाव मिळाला आहे.

यामुळे कांदा पीक घेण्यासाठी आलेल्या एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कमही कांदा विक्रीतून मिळू शकलेली नाही. या शेतकऱ्याला कांदा पिकासाठी प्रति एकरी ६६ हजार रुपये खर्च झाला असून यातून उत्पादित झालेल्या कांदा विक्रीतून मात्र केवळ ६६४ रुपये उत्पन्न मिळाले आहे. म्हणजे संबंधित शेतकऱ्याला ६५ हजार ३३६ रुपयांचा तोटा झाला आहे. यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी, आता मायबाप सरकार तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं असा सवाल केला आहे. 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका प्रतिष्ठित शेतकऱ्याच्या बाबतीत ही घटना घडली आहे. मग सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय अवस्था असेल, हा विचार केलेलाही न बरा, असा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला या घटनेने दिला आहे. मुळात एकरी सुमारे साडेसातशे किलो म्हणजेच साडेसात क्विंटल कांदा उत्पादन निघाले आहे. त्यातही एकाच शेतात पिकलेल्या कांद्याला एकाच आडत दुकानात वेगवेगळे भाव मिळाले आहेत. यासाठी संबंधित आडतदाराने या कांद्याचे तीन वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण केले आहे.

यानुसार यापैकी पहिल्या गटातील ८ गोण्यांना तीन रुपये किलो, ४ गोण्यांना दोन रुपये किलो आणि तीन गोण्यांना १ रुपया किलो भाव मिळाला आहे. या विक्रीतून आलेल्या एकूण रकमेपैकी भराई, तोलाई, मापाईचा खर्च वजा जाता संबंधित शेतकऱ्याच्या पदरात प्रतिकिलो सरासरी ८९ पैशांचा भाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांना एका एकराची मशागत (नांगरणी, मोगडणी आणि पाळी घालणे) करण्यासाठी सुमारे तीस ते ३५ हजार रुपये खर्च येतो. बियाणे खरेदी, रासायनिक खते घालण्यासाठी आणि कांदा पिकांचा विविध रोगराई पासून बचाव करण्यासाठी किटकनाशके खरेदी करण्यासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च करावा लागतो. खुरपणी, पिकाला वेळोवेळी पाणी देण्यासाठी दहा ते बारा हजार रुपयांचा खर्च येतो.

याशिवाय कांदा काढणी, त्याची निगराणी करणे, गोण्या खरेदी, कांदा गोण्यांमध्ये भरून त्याची शेतापासून घरापर्यंत वाहतूक करण्याचा खर्च वेगळाच. शिवाय घरापासून आडतीपर्यंत वाहतूक खर्च करावा लागतो. कांद्याचा उत्पादन खर्च व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात जमीन-अस्मानचा फरक पडत आहे. परिणामी शेतकऱ्यांना प्रति एकरी केलेल्या खर्चात ९९ टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागत आहे.