Gliding Center Hadapsar, Pune : इंधन विरहित विमानातून हवाई सफर घडविणाऱ्या ग्लायडिंग सेंटरची 'पंचाहत्तरी'!

पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष : सेंटरचे स्टेशन इन्चार्ज कॅप्टन शैलेश चारभे यांच्याशी केलेली खास बातचीत.

Gliding Center Hadapsar, Pune : इंधन विरहित विमानातून हवाई सफर घडविणाऱ्या ग्लायडिंग सेंटरची 'पंचाहत्तरी'!
पुणे:- हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरची क्षणचित्रे आणि सेंटर इन्चार्ज कॅप्टन शैलेश चारभे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि नागरिकांना हवाई सफरीचा आनंद घेता यावा, या उद्देशाने देशभरात  विविध ठिकाणी एकूण १८ ग्लायडिंग सेंटर्स सुरू केले. यापैकीच एक ग्लायडिंग सेंटर पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे कार्यरत आहे‌. हे ऐतिहासिक सेंटर आहे. विशेष म्हणजे सध्या कार्यरत असलेले हडपसर (पुणे) हे देशातील एकमेव सेंटर आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये या सेंटरला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर या सेंटरचे प्रमुख (स्टेशन इन्चार्ज) कॅप्टन शैलेश चारभे यांच्याशी प्रश्नोत्तरे स्वरूपात केलेली ही खास बातचीत.

- प्रा. मीरा बडे-सांगळे

प्रश्न :- नमस्कार सर, पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरला यावर्षी (नोव्हेंबर २०२५) ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र ग्लायडिंग सेंटर म्हणजे काय आणि हे सेंटर सुरू होण्यामागची पार्श्वभूमी काय आणि याचा इतिहास अनेकांना माहीत नाही. याबाबत आपण माहिती देऊ शकाल का?

- कॅप्टन शैलेश चारभे :- होय. ग्लायडिंग हा मुळचा इंग्रजी शब्द आहे. या शब्दाचा मराठी अर्थच विमानाने भरारी घेणे असा आहे. मात्र येथे भरारी घेण्यासाठी इंधन विरहित विमान असते. विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना विमानातून सफारीचा आनंद घेता येतो. याबाबतचा इतिहास खुप रंजक आहे. जगात सर्वप्रथम जर्मनीमध्ये ग्लायडर म्हणजे इंधन विरहित विमान उड्डाण करण्यात आले. जर्मनीतील कार्ल विल्व्हेम ओटो लिलिएन्थल यांनी सन १८९१ मध्ये हे उड्डाण केले. ते विमान वाहतुकीचे जर्मन प्रणेते होते. ओटो लिलिएन्थल हे व्यवसायाने अभियंता होते. ग्लायडरसह योग्य दस्ताऐवजीकरण केले व त्याची पुनरावृत्ती करून यशस्वी उड्डाण करणारे ते जगातील पहिले व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना "उडणारा माणूस" म्हणूनच ओळखले जाऊ लागले. हवेपेक्षा जड विमानाची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. त्यानंतर अमेरिकेचे ऑर्व्हिल आणि विल्बर राईट हे दोघे बंधू विमानाचे प्रवर्तक बनले. राईट बंधूंनी जगातील पहिले यशस्वी विमान तयार करून त्याचे उड्डाण केले. दि. १७ डिसेंबर १९०३ रोजी किटी हॉक, उत्तर कॅरोलिना येथे त्यांच्या राईट फ्लायर विमानातून त्यांनी (राईट बंधू) पहिले विमान उड्डाण केले. हे विमान ऑर्व्हिल राईट यांच्या नियंत्रणाखाली होते आणि ते १२ सेकंदापर्यंत हवेत राहिले. हे विमान सरळ रेषेत १२० फूट उंच अंतरावर उडवले गेले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या विमानात आणि उड्डाण कौशल्यात सुधारणा केली आणि १९०५ मध्ये त्यांनी त्यांचे तिसरे विमान पूर्णपणे व्यवहार्य ठरले.

प्रश्न :- भारतातील इंधन विरहित विमान (ग्लायडर) इतिहास काय आहे.? 

- कॅप्टन शैलेश चारभे :- भारतामध्ये सन १९२८ मध्ये औंध संस्थानचे राजे पंतप्रतिनिधी आणि फरदून इराणी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी भारतात पहिल्यांदा ग्लायडिंगला चालना दिली. यासाठी औंधचे राजे पंतप्रतिनिधी यांनी ५ हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीच्या माध्यमातून जर्मनीतून ग्लायडिंगच्या ब्ल्यू प्रिंट मागवल्या आणि याच्या माध्यमातून प्रायमरी ग्लायडर तयार केले. सुरुवातीला हे ग्लायडर पुणे शहरातील चतुश्रृंगीच्या डोंगरावरून उड्डाण करत असे. भारतावर त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण भारतभर तीव्र लढे चालू होते. त्यावेळी काही काळासाठी याचे उड्डाण बंद झाले. त्यानंतर फुरसुंगी येथे पुन्हा हे ग्लायडिंग सेंटर चालू करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने युवा पिढीला हवाई क्षेत्रात चालना देण्यासाठी इंडियन ग्लायडिंग असोसिएशनच्या (Indian gliding association) भारत सरकारच्या विमान वाहतूक विभागाकडून (civilization department) दि. ७ नोव्हेंबर १९५० रोजी भारतातील ग्लायडर सेंटरचा जन्म झाला. यानुसार भारतात सर्वप्रथम पुण्यातील हडपसर या ठिकाणी ग्लायडिंग सेंटर सुरू झाले. त्याकाळी भारतात सर्वप्रथम या सेंटरमधून महिला पायलट म्हणून उत्तीर्ण झालेली सर्वात कमी वयाची महिला म्हणजे रुचिरा गोरे. गोरे या अवघ्या सोळाव्या वर्षी पायलट झाल्या.

प्रश्न :- पुण्यातील नागरिकांच्या मनात हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून कोरले गेले आहे. पण अनेक नागरिकांना ग्लायडिंग सेंटर म्हणजे नेमके काय, हेच माहित नाही. त्यामुळे नागरिकांच्या माहितीसाठी ग्लायडिंग सेंटर म्हणजे काय, हे सांगू शकाल का? 

- कॅप्टन शैलेश चारभे :- होय. ग्लायडिंग हा मुळचा इंग्रजी शब्द आहे. या शब्दाचा मराठी अर्थच विमानाने भरारी घेणे असा आहे. मात्र येथे भरारी घेण्यासाठी इंधन विरहित विमान असते. विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना विमानातून सफारीचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने केंद्र सरकारने पुण्यातील हे ग्लायडिंग सेंटर सुरू केले 
आहे.

- प्रश्न :- ग्लायडिंग सेंटर उभारणीमागची मूळ संकल्पना कोणाची आहे.? 

- कॅप्टन शैलेश चारभे :- भारतात ग्लायडिंग सेंटर सुरू करण्या मागची मूळ संकल्पना भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची आहे. यानुसार पंडीत नेहरू यांनी देशभरात विविध ठिकाणी एकूण १८ ग्लायडिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आणि यानुसार तत्कालीन मुंबई प्रांतातील ग्लायडिंग सेंटर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील हडपसर गावाच्या हद्दीत उभारण्यात आले. भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि हे सेंटर मुंबई प्रांतातून महाराष्ट्रात आले‌. आता पुर्वीचे हडपसर हे गावही पुणे महापालिकेत आहे. त्यामुळे पुर्वी ग्रामीण भागात असलेले हे सेंटर शहरी भागात आले आहे. 

प्रश्न :- या ग्लायडिंग सेंटरच्या उभारणीमागचा मूळ उद्देश काय, हे सांगू शकाल का?

- कॅप्टन शैलेश चारभे :- होय. भारतातील सामान्यातील सामान्य म्हणजेच अगदी अतिसामान्य व्यक्तीलासुद्धा विमान सफारीचा आनंद व अनुभव घेता यावा, हा या ग्लायडिंग सेंटरच्या उभारणी मागचा मूळ उद्देश आहे‌‌. यासाठीच तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी दि. ७ नोव्हेंबर १९५० रोजी हे ग्लायडिंग सेंटर सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या विमान उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत या ग्लायडिंग सेंटरची स्थापना झालेली आहे. या सेंटरमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अगदी कमी शुल्कात म्हणजे केवळ १८७ रुपयात विमान सफारीचा आनंद घेता येतो. त्यामुळे हा इतका अल्प खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे. येथील विमान हे इंधन विरहित आहे. त्यामुळे आजपर्यंत लाखो सामान्य नागरिक विशेषतः युवक, महिला आणि विद्यार्थ्यांनी या विमान उड्डाणाचा आनंद घेतला आहे. 

प्रश्न :- पुण्यातील ग्लायडिंग सेंटरविषयीची माहिती थोडक्यात सांगू शकाल का? 

- कॅप्टन शैलेश चारभे :- मुळात हे पुणे येथील ग्लायडिंग सेंटर आहे. परंतु ते स्थापनेपासून आजतागायत हडपसर ग्लायडिंग सेंटर म्हणूनच ओळखले जाते. हे देशातील पहिले ग्लायडिंग सेंटर आहे. हडपसर या ठिकाणी सुमारे २५० एकर इतक्या क्षेत्रावर हे सेंटर आहे. या ग्लायडरची धावपट्टीसुद्धा मोठी आहे. ग्लायडर म्हणजे इंधन विरहित विमान होय. हे पूर्वीच्या विमानाचे मॉडेल आहे. हे ग्लायडर इंधनावर नव्हे तर, हवेवर चालते हीच याची खासियत आहे. हे सेंटर आता एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून नावारूपाला आले आहे. 

प्रश्न :- आपल्या या ग्लायडिंग सेंटरच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी काही उपयुक्त उपक्रम राबविले जातात का? 

- कॅप्टन शैलेश चारभे :- होय. ज्या विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे किंवा एअर फोर्समध्ये जाण्याचे स्वप्न आहे. अशा विद्यार्थ्यांनी या सेंटरला आवर्जून भेट दिली पाहिजे आणि विमान उड्डाणाचा आनंद प्रत्यक्षपणे घेतला पाहिजे. अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना भरारी घेण्याची संधी येथे मिळते, हा ग्लायडरचा प्रत्यक्ष अनुभव आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत नेण्यासाठीचा हा एक खास मार्ग ठरू शकतो. आजच्या काळातील शालेय मुले हे मैदानी खेळ खेळण्यापेक्षा जास्त मोबाईलमध्ये रमू लागले आहेत.विशेष म्हणजे मुले ही २४ तास मोबाईलमध्ये रमलेली असतात, हेच पालकांच्या लक्षातच येत नाही किंवा लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कारण मोठ्या शहरांमध्ये मुलांना अंगणात खेळता येत नाही, मैदानी खेळ खेळता येत नाहीत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शहरांमध्ये आई-वडील आणि मुलं हेच कुटुंब असतं. ना त्यांना गोष्ट सांगायला आजीआजोबा असतात ना, मैदानी खेळ खेळायला मैदान असतं. फ्लॅट सिस्टीममुळे अंगण राहिले नाही व  शेजाऱ्या-पाजाऱ्यांबरोबर संवादही राहिलेला नाही. म्हणूनच आजचे पालक असा विचार करतात की, मोबाईलशिवाय मुलांना पर्यायच नाही. त्यामुळेच तर ते मुलांच्या हातात बिनधास्त मोबाईल देत आहेत. पण या मोबाईलचा मुलांवर किती दुष्परिणाम होतो हे पालकांच्या लक्षातच येत नाही. पालक आणि मुलं यांच्यातील संवाद संपुष्टात येत आहे. त्यामुळेच आजच्या पिढीला आपले कर्तव्य जबाबदारी व आपलेपणाची जाणीवच राहिलेली दिसत नाही. स्वतःच्या करिअरकडे स्वतः बघणे,  त्यासाठी अतोनात प्रयत्न करणे,  झगडणे आणि आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धडपड करणे हे आजकालच्या पिढीमध्ये दिसूनच येत नाही. 

प्रश्न :- मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काय करावे, असे आपल्याला वाटते.?

- कॅप्टन शैलेश चारभे:- सध्याच्या काळात तरुणांमध्ये विनम्रता, सहनशीलता,धैर्य पाहायला मिळत नाही,याचीच खंत मला वाटत आहे. मोबाईल हे यंत्र वाईट अजिबातच नाही. पण त्याचा वापर किती आणि कशासाठी करावा हेच मुलांच्या लक्षात येत नाही. दुर्दैवाने या पिढीतील पालकही मुलांना या गोष्टीची जाणीव करून देत नाहीत. त्यामुळे तरुण पिढी मोबाईलच्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहारी चालली आहे की, याचे दुष्परिणाम खूप भयानक आणि लांबपर्यंत दिसून येतील. हे टाळण्यासाठी मुलांसाठी ग्लायडिंग सेंटर भेट हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांनी ग्लायडिंग सेंटरला भेट देण्यासाठी किमान एक दिवसीय सहल काढली पाहिजे. यासाठी ग्लायडिंग सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी केले जाईल. विद्यार्थ्यांना हे मैदान दाखवा आणि मुलांच्या मनामध्ये अशी स्वप्न निर्माण करा की, तुम्हालाही आकाशात उडायचे असेल तर, इथे तुमच्या पंखांना बळ मिळू शकते. त्यामुळे खरंच किमान एकदा तरी विद्यार्थ्यांनी येथे येऊन आकाशात झेप घ्यायला शिकलं पाहिजे, असे मला वाटते. यासाठी शाळा, महाविद्यालयांना ग्लायडिंग सेंटरच्या वतीने आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी मी ग्वाही देतो आणि विद्यार्थ्यांना ग्लायडिंग सेंटरच्या भेटीसाठी येण्याचे आवाहन करतो.

प्रश्न :- शाळा-महाविद्यालयीन युवक आणि त्यांच्या पालकांना आपण काय संदेश द्याल? 

- कॅप्टन शैलेश चारभे  :-  आजची पिढी ही अति उत्साही आणि उतावळी आहे. ही पिढी गरम डोक्याची आणि पटकन कोणत्याही सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टींना प्रतिसाद देणारी आहे. विशेषत: नकारात्मक विचारांना लवकर बळी पडणारी आहे. सामाजिकतेचे भान न ठेवता कोणत्याही सामाजिक प्रक्रियेला मनाला वाटेल, तशी व्यक्त होणारी ही पिढी आहे. यावर मार्ग काढण्यासाठी युवकांनी साहसी खेळांकडे वळणे गरजेचे आहे. सुदृढ आणि साहासी पिढी घडणे आवश्यक आहे. मात्र आजच्या काळात अनेक आजारांनी ग्रस्त समाज बनू लागला आहे. अन्य खेळांप्रमाणेच ग्लायडींगलापण प्रोत्साहन देणे खूप महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वी ग्लायडिंग या साहसी क्रीडा प्रकारात विविध शाळा, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यामध्ये सहभागी होणारे महाविद्यालयीन युवक सक्रिय होते. 'एनसीसी' ही प्रत्येक राज्यात लाखो युवकांना भारतीय सेनेत दाखल होण्यासाठी सक्षम करत असते‌. याच धर्तीवर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातच पायलट होण्याचे स्वप्न बघितले पाहिजे आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी ग्लायडिंग सेंटरला भेट द्यावी, हवाई सफरीचा आनंद व अनुभव आणि पायलटचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन करत आहे. हे ग्लायडिंग सेंटर हे विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले आहे.

 कॅप्टन शैलेश चारभे यांचा प्रवास

कॅप्टन शैलेश चारभे हे याच ग्लायडिंग सेंटरचे विद्यार्थी आहेत. सध्या ते या सेंटरचे संचालक आहेत. म्हणजेच चारभे यांचा या सेंटरमधील प्रवास हा विद्यार्थी, पायलट ते संचालक असा आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक युवक- युवतींना पायलट म्हणून प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी येथे उड्डाणाचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी एका दिवसात म्हणजेच सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत त्यांनी तब्बल १५३ वेळा विमान उड्डाणाचा विक्रम केला आहे. या विक्रमाची लिमका बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.