Opposition leader rahul gandhi case :- बदनामी खटल्याशी सात्यकी सावरकर यांच्या आईकडील वंशवेलाचा संबंध नाही, न्यायालयाचा निर्वाळा!

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी खटला : राहुल गांधी यांच्या वकिलांनी केली होती मागणी 

Opposition leader rahul gandhi case :- बदनामी खटल्याशी सात्यकी सावरकर यांच्या आईकडील वंशवेलाचा संबंध नाही, न्यायालयाचा निर्वाळा!
पुणे:- न्यायालयातील सुनावणीबाबतचे ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १२ जून २०२५ :-  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या बदनामी खटल्याशी तक्रारदार सात्यकी सावरकर यांच्या आईकडील वंशवेलाचा संबंध नसल्याचा निर्वाळा खासदार व आमदारांच्या विरोधातील खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे येथील विशेष न्यायालयाने दिला आहे. खासदार राहुल गांधी यांचे वकील अॅड मिलिंद पवार यांनी या मागणीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी आता दि. ३ जुलै  २०२५ रोजी ठेवण्यात आली आहे. 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या न्यायालयासमोर सुरू आहे. फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी त्यांची आई हिमानी अशोक सावरकर यांच्या आईकडची गोडसे कुटुंबीयांकडूनची वंशावळ न्यायालयापासून लपवून ठेवली आहे. त्यामुळे फिर्यादी सात्यकी सावरकर यांना त्यांच्या आईकडील वंशवेल दाखल करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी विशेष न्यायालयात केला होता. मात्र आईकडील वंशवेल या खटल्याशी संबंधित नाही, असे निरिक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने तो अर्ज  निकाली काढला आहे.

महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे आजोबा गोपाळ गोडसे असून ते महात्मा गांधी यांच्या खुनातील प्रमुख आरोपींपैकी एक होते. गोपाळ गोडसे जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेले होते. शिवाय गोपाळ गोडसे व नथुराम गोडसे हे सख्खे भाऊ आहेत. गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधी यांच्या खुनात सहआरोपी होते. नथुराम गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) चा कार्यकर्ता व सभासद होता, असे अॅड मिलिंद पवार यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात नमूद केले होते.दि.५ मार्च २०२३ रोजी राहुल गांधी यांनी लंडनमधील डायसापोरा येथील एका कार्यक्रमात भाषण करताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी केल्याचा आरोप करत सात्यकी सावरकर यांनी हा खटला दाखल केला आहे.

दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या लंडनमधील भाषणात ज्या पुस्तकाचा उल्लेख केला होता, ते पुस्तक राहुल गांधी यांनी सात्यकी सावरकर यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सात्यकी सावरकर यांनी अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली. त्यावर राहूल गांधी यांचे वकील ॲड. पवार यांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मिळावा, असा अर्ज दाखल केला. न्यायालयाने अ‍ॅड. मिलिंद पवार यांचा अर्ज मंजूर केला व म्हणणे मांडण्यास वेळ दिला आहे. यानुसार या खटल्याची पुढील सुनावणी दिनांक ३ जुलै २०२५ रोजी होणार आहे.