Local body elections 2025 : महाराष्ट्रातील नगरपालिकांची येत्या 2 डिसेंबरला तर, जिल्हा परिषदांची येत्या १५ डिसेंबरला निवडणूक? 

राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी दुपारी ४ वाजता घोषणा होणार : जिल्हा परिषदांच्या अंतिम मतदार याद्या पाहण्यासाठी उपलब्ध 

Local body elections 2025 : महाराष्ट्रातील नगरपालिकांची येत्या 2 डिसेंबरला तर, जिल्हा परिषदांची येत्या १५ डिसेंबरला निवडणूक? 
पुणे:- जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक संभाव्य कार्यक्रम

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ४ नोव्हेंबर २०२५ :- महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर २०२५ तर, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी येत्या १० ते १५ डिसेंबर या कालावधीत मतदान होण्याची शक्यता आहे‌. यानुसार नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता दि.४ नोव्हेंबर रोजी सायंकाळपासून तर, जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता ही येत्या १० नोव्हेंबरपासून लागू होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची घोषणा राज्य निवडणूक आयोग मंगळवारी (दि.४ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता करणार आहे. या वृत्ताला राज्य निवडणूक आयोगातील सुत्रांकडून दुजोरा देण्यात आला आहे. 

दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या अनुक्रमे गट आणि गणनिहाय अंतिम मतदार याद्या पाहण्यासाठी सोमवारपासून(दि‌.३ नोव्हेंबर)  उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारयाद्या आपापल्या तहसील कार्यालयात पाहता येणार आहेत.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीच्या कार्यक्रमानुसार दि. ३ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत या मतदार याद्या पाहण्यासाठी सर्वांना उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले होते. सुधारित कार्यक्रमानुसार या मतदार याद्या निश्चित केलेल्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून (दि.३ नोव्हेंबर) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका (नगरपरिषदा) आणि ४२ नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या मतदार याद्या प्रसिद्धी बाबतच्या नवीन कार्यक्रमानुसार सोमवारी (दि‌. ३ नोव्हेंबर) अधिप्रमाणित करण्यात आल्या आहेत. दि. ३ नोव्हेंबरपासूनच या मतदार याद्या मतदारांना आणि सर्व पक्षांना  माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि‌‌. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.

दोन टप्प्यात दहा दिवसांचा फरक ठेवणार 

दरम्यान, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका या दोन टप्प्यांत घेण्यात येणार असल्या तरी, या दोन्ही निवडणुकांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमात दोन आठवड्यांचा फरक ठेवण्यात येणार आहे. शिवाय हे दोन्ही टप्पे येत्या २० डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. यानुसार येत्या १० डिसेंबरपुर्वी नगरपालिका व नगरपंचायती आणि येत्या २० डिसेंबरपुर्वी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधन निवडणूक आयोगावर असणार आहे. 

येत्या २० डिसेंबरपासून तिसरा टप्पा 

पहिल्या दोन टप्प्यांत नगरपालिका व नगरपंचायती आणि जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर येत्या दि. २० डिसेंबरपासून तिसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात मुंबई महापालिका वगळता उर्वरित २८ महानगर पालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.