Pdcc bonds purchase Permission : पुणे जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण सहकारी पतसंस्थांना पुणे जिल्हा बँकेचे कर्जरोखे खरेदी करण्यास राज्य सरकारची मंजुरी!
जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थांना जिल्हा बँकेचे कर्जरोखे खरेदीची संधी : येत्या मंगळवारपर्यंत (दि.११ ऑगस्ट) मुदत
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १० ऑगस्ट २०२६ :- पुणे जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण सहकारी पतसंस्थांच्या तरलतेसाठी ( SLR ) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) पीडीआय (PDI) आणि एलटीएसबी ( LTSB) हे कर्जरोखे बाँड्स) खरेदी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारच्या या मंजुरीमुळे पुणे जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थांना आता तरलतेसाठी (SLR) करावयाच्या एकूण ठेवीच्या किमान २५ टक्के एवढ्या गुंतवणुकीपैकी ५ टक्के गुंतवणूक ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जरोख्यामध्ये करता येणार आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या कर्जरोख्यांमधील ही गुंतवणूक बँकेच्या वैधानिक तरलतेसाठी ग्राह्य धरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे ग्रामीण व नागरी पतसंस्थांना येत्या दि. ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत हे कर्जरोखे (बाँड्स) खरेदी करता येणार असल्याचे जिल्हा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे यांनी सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दि. २२ जुलै २०२६ पासून पुणे जिल्हा बँकेच्या एलटीएसबी व पीडीआय या दोन कर्जरोखे (बॉंड्स) विक्री योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही प्रकारच्या योजनेत प्रत्येकी किमान दहा हजार रुपयांचे रोखे खरेदी करता येणार आहेत. यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना आणि आता नागरी व ग्रामीण पतसंस्थांना पुणे जिल्हा बँकेचे हे रोखे खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
जिल्हा बँकेच्या कर्जरोख्यांच्या दोन योजनांची एलटीएसबी (Long Term Subordinated Bonds Series) व पीडीआय (Perpetual Debt Instrument)अशी नावे आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते श या दोन्ही योजनांचा दि. २२ जुलै २०२६ रोजी शुभारंभ करण्यात आला होता.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या एलटीएसबी (Long Term Subordinated Bonds Series) या कर्जरोखे योजनेत किमान दहा हजार रुपये किंवा त्याच्या पटीत गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एका कर्जरोख्याची किंमत दहा हजार रुपये असून त्यावरील व्याजाची रक्कम दरमहा गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या कर्जरोख्याची मुदत १० वर्षांची आहे. पीडीआय (Perpetual Debt Instrument) या कर्जरोखे योजनेअंतर्गतही किमान दहा हजार रुपये किंवा त्याच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेतील व्याजाची रक्कम प्रत्येक तीन महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होणार असून, या कर्जरोख्याची मुदत कायमस्वरूपी (Perpetual) आहे.
फक्त पंधरा दिवसांत ४१७ कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची विक्री
दरम्यान, या कर्जरोखे योजना सुरु झाल्यापासून म्हणजेच दि. २२ जुलै २०२६ पासून दि. ७ ऑगस्ट या अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत एकूण ४१७ कोटी २७ लाख ३० हजार इतक्या रकमेच्या कर्जरोख्यांची विक्री झालेली आहे.
राज्य सरकारने नागरी आणि ग्रामीण सहकारी पतसंस्थांना जिल्हा बँकेचे कर्जरोखे खरेदीसाठी दिलेल्या मंजुरीचा पुणे जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थांनी फायदा घ्यावा.
- संजय शितोळे
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा बँक, पुणे.
