RTE Admission enquiry : 'आरटीई'च्या एकूण प्रवेशांपैकी १० टक्के प्रवेशांची फेरतपासणी करणार! 

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची घोषणा 

RTE Admission enquiry : 'आरटीई'च्या एकूण प्रवेशांपैकी १० टक्के प्रवेशांची फेरतपासणी करणार! 
पुणे:- पुणे जिल्ह्यातील आरटीई मोफत प्रवेशाच्या चौकशीच्या मागणीबाबत ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. २३ ऑक्टोबर २०२६ :- बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदींनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये देण्यात आलेल्या एकूण मोफत प्रवेशांपैकी १० टक्के प्रवेशांची फेरतपासणी करण्यात येईल, अशी घोषणा गुरुवारी (दि.२२ ऑक्टोबर) पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सर्वसाधारण सभेत बोलताना केली. 

जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या आरटीई प्रवेशात अनागोंदी कारभार झाल्याचा आरोप करत, याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली होती. या मागणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या प्रक्रियेत मोफत प्रवेश मिळालेल्या खेड तालुक्यातील १४ पाल्यांच्या पालकांवर शिक्षण विभागाने फौजदारी गुन्हे दाखल केले असल्याचे सभागृहास सांगितले. तरीही यामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत एकूण प्रवेश मिळालेल्या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी पुन्हा एकदा केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी ही घोषणा केली. 

'आरटीई' कायद्यानुसार पात्र बालकांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील खासगी शाळांमधील एकूण प्रवेशांपैकी २५ टक्के प्रवेश मोफत देण्यात येतात. मात्र यामध्ये मोठी अनागोंदी झाली असून, या प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी बोलताना केला. या प्रवेश प्रक्रियेतील पात्रता आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी योग्य प्रकारे झाली नसल्याचेही जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर या मोफत प्रवेशांपैकी १० टक्के प्रवेशांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या फेरतपासणीमध्ये निवडलेल्या प्रवेशांशी संबंधित कागदपत्रे आणि पात्रतेच्या निकषांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, या तपासणीत काही त्रुटी किंवा अनियमितता आढळल्यास नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. मोफत प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राखणे आणि पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळण्याची खात्री करणे, या दृष्टीने ही फेरतपासणी महत्त्वाची ठरणार आहे.