Pune Zilla Parishad election : पुणे झेडपीच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार देण्यात सर्वच राजकीय पक्ष अपयशी!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक ७२ उमेदवार रिंगणात : सर्वात कमी मनसेचे उमेदवार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ३ फेब्रुवारी २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना अपयश आले आहे. या निवडणुकीच्या रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७२ जागांवर तर, सर्वात कमी म्हणजेच केवळ ३ उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उतरविले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेतील एकूण सदस्यांची संख्या ७३ आहे. यापैकी ७२ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार या निवडणुकीत दिले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्नर तालुक्यातील एका गटाचा अपवाद वगळता अन्य सर्व तालुक्यांमधील सर्वच्या सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ भारतीय जनता पक्षाने ७३ पैकी ५८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.भाजपलाही पुणे जिल्हा परिषदेत सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देण्यात अपयश आले आहे.
तब्बल चार वर्षाच्या खंडानंतर यंदा पुणे जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील एकूण सदस्यांची संख्या ७५ होती. परंतू, शहरालगतची ३४ गावे ही टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्याने जिल्हा परिषदेतील सदस्यांच्या संख्येत दोनने घट होऊन ती यंदा ७३ झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणजेच बहुमतासाठी यंदा एकूण ३७ सदस्य असणे आवश्यक आहे.
निवडणूक रिंगणातील पक्षनिहाय एकूण उमेदवार
- राष्ट्रवादी कॉंग्रेस --- ७२
- भाजप --- ५८
- शिवसेना --- ३८
- शिवसेना (उबाठा) --- २६
- कॉंग्रेस --- १४
- राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) --- ०६
- मनसे --- ०३
- अन्य व अपक्ष --- ८१
- एकूण --- २९९.
