Pune zp school Jijau app : पुणे झेडपीच्या शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीला आता 'जिजाऊ-पालक सहभागी मंच' ॲप!
शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी डिजिटल व्यासपीठाची निर्मिती : झेडपी अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते ॲपचे उद्घाटन
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ ऑगस्ट २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणून या सर्वांमधील संवाद अधिक वाढविण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने या सर्वांसाठी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यासाठी एका खास ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले आहे.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते या ॲपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बांधकाम समितीच्या सभापती दिपाली हुलावळे, कृषी समितीचे सभापती अमोल नलावडे, समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर आदी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना एकत्रित डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था न राहता विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व समाजाला जोडणारे प्रभावी केंद्र म्हणून अधिक सक्षम व्हाव्यात, या व्यापक उद्देशाने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या 'जिजाऊ' 'ॲप'च्या माध्यमातून प्रत्येक शाळेला स्वतंत्र डिजिटल ओळख मिळणार असून शाळेची माहिती, विविध उपक्रम, शाळेच्या समित्या, विकास आराखडे, सूचना, कार्यक्रमांचे कॅलेंडर, विद्यार्थी व शिक्षकांच्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती, प्रकाशने, माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आणि शाळेला योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.
हे खास ॲप पुणे जिल्हा परिषद आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन (Open Links Foundation) यांच्या संयुक्त सहभागातून झेडपी शाळा, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांना एका समान डिजिटल व्यासपीठावर जोडण्यासाठी विकसित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
झेडपी शाळांशी पालक असे जोडले जाणार
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक हे या ॲपशी क्यु. आर. कोड ( QR Code) किंवा वेब लिंकच्या (Web Link) माध्यमातून जोडले जाणार आहेत. यामुळे पालकांना संबंधित शाळेच्या डिजिटल पेजवर सहज प्रवेश करता येणार असून पालक नोंदणी, शिक्षकांकडून पडताळणी, सामुदायिक उपक्रम (Club Activities),शैक्षणिक साहित्य, लाईक, कमेंट्स आणि बुकमार्क (Bookmark) आदींमुळे पालकांचा शाळेशी संवाद व सहभाग अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला आपल्या कार्याची, उपक्रमांची आणि गुणवत्तेची डिजिटल स्वरुपात प्रभावी मांडणी करता येणार असल्याने जिल्हा परिषद शाळांची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होईल. तसेच माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेशी पुन्हा जोडले जाण्याची आणि शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल. शिवाय पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि समाज यांचा शाळेतील सहभाग वाढवून शाळांच्या विकासाला लोकसहभागाची जोड मिळेल. अशा प्रकारे 'माझी शाळा,माझा अभिमान' या भावनेला बळ देत शाळा, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व समाज यामधील सहभागाची साखळी अधिक मजबूत करण्यासाठी जिजाऊ पालक सहभाग मंच' नवी दिशा देईल.
- वीरधवल जगदाळे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद,
पुणे.
पुणे जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा ही डिजिटल प्रवाहानी जोडली जावी, त्यांना आपापल्या गुणवत्तेची, नाविन्यपूर्ण उपकमांची आणि यशाची प्रभावीपणे मांडणी करता यावी, तसेच एका शाळेतील चांगल्या उपक्रमांमधून इतर शाळांना प्रेरणा घेता यावी. यामुळे अन्य शाळांनाही पुढे जाण्याची संधी मिळावी,हा 'जिजाऊ- पालक सहभाग ॲप'च्या निर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे.
-विवेक वळसे-पाटील,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद,
पुणे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील नाविन्यपूर्ण उपक्रम,विद्यार्थ्यांचे यश व शिक्षकांचे उल्लेखनीय कार्य, पालक व माजी विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबतची माहिती अन्य शाळांपर्यंत पोहोचल्याने सकारात्मक स्पर्धा, परस्पर सहकार्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांच्या गुणवत्तावाढी- सोबतच शाळांच्या विकासाला चालना देण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरेल.
- गजानन पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
