Mithila Samaj Organization: स्वच्छतेतून सामाजिक बांधिलकीची जपणूक : पुणे येथील मिथिला समाज संस्थेच्या १०० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग!
पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती : पुणे–दरभंगा नियमित रेल्वेसेवेचीही मागणी
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ ऑक्टोबर २०२६ :- हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश देणारे शंभरहून अधिक हात..., चेहऱ्यावर उत्साह व मनात सामाजिक बांधिलकीची भावना ठेवत पुण्यातील मिथिला समाज संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून पुणे येथील रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता केली.यातूनच त्यांनी ही केवळ परिसराची स्वच्छता नव्हे तर, ‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी’ हा संदेशही समाजाला दिला आहे.
भारत सरकारच्या स्वच्छता पंधरवाडा अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील मिथिला समाज संस्थेच्या वतीने या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात संस्थेचे १०० हून अधिक स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छतेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. या अभियानात पुणे शहरातील विविध ठिकाणचा परिसर स्वच्छ करताना स्वयंसेवकांनी नागरिकांमध्येही स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला
विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती
या अभियानाला पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश वर्मा उपस्थित होते. त्यांनी यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले आणि स्वच्छता अभियान हे केवळ एका दिवसापुरते किंवा एखाद्या संस्थेपुरते मर्यादित न राहता या अभियानाला अधिक व्यापक लोकसहभागाची जोड मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी मिथिला समाज संस्थेच्यावतीने या अभियानाच्या आयोजनासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आणि समन्वयाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
स्वच्छतेसोबत संस्कृती आणि समाजसेवेचीही वाटचाल
पुण्यात स्थायिक झालेल्या मिथिला समाजातील नागरिकांना एकत्र आणण्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी जोडून ठेवण्याचे काम ही संस्था करत आहे. पुणे शहरातील मिथिलावासीयांचा सर्वांगीण विकास, सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि सामाजिक उत्थानासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिवाय या अभियानाच्या निमित्ताने संस्थेने पुणे रेल्वे प्रशासनासमोर पुणे–दरभंगा रेल्वेगाडी दररोज चालविण्याची मागणीही मांडली. पुणे आणि मिथिला क्षेत्रादरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे येणे-जाणे असते. ही रेल्वेसेवा सुरू झाल्यास प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच पुणे आणि मिथिला या दोन प्रदेशांमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली.
‘स्वच्छता’ एका दिवसाची नव्हे, तर रोजची सवय
अभियानाच्या समारोपावेळी स्वच्छता केवळ एखाद्या विशेष दिनानिमित्त किंवा अभियानापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनविण्याचे आवाहन यावेळी मिथिला समाज संस्थेच्या वतीने करण्यात आले. पुणे शहरात राहणाऱ्या विविध समाजघटकांनी आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीला जपत स्थानिक समाजाच्या प्रश्नांमध्येही सक्रिय सहभाग घेण्याचा संदेश या उपक्रमातून दिला. ‘स्वच्छता, सेवा, संस्कृती आणि समाज’ या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून मिथिला समाज संस्था पुण्यातील आपल्या सामाजिक कार्याची वाटचाल पुढेही सुरू ठेवणार आहे.
