Ex Mla granthatula : लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे यांची ६१ व्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला!
चार्मस ग्रुपच्यावतीने पायगुडे यांना ३६१ पुस्तकांची भेट : विविध विषयांवरील पुस्तकांनी सजली ग्रंथतुला
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ ऑक्टोबर २०२६ :- वाढदिवस म्हटला की केक, शुभेच्छा व सत्कार यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, पुणे येथील चार्मस ग्रुपने याला फाटा देत पुण्यातील लोकसेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त पायगुडे यांची अनोख्या पद्धतीने ग्रंथतुला आयोजित करून वाचनसंस्कृतीचा संदेश दिला. या ग्रंथतुलेत विविध विषयांवरील तब्बल ३६१ पुस्तके पायगुडे यांना भेट देण्यात आली.
पुण्यातील चार्मस ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मराठवाड्यातील धाराशिव येथील स्वआधार या मतिमंद, अनाथ मुलींच्या संस्थेचे संस्थापक सचिव शहाजी चव्हाण यांच्या हस्ते साहित्य, इतिहास, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, विज्ञान, चरित्रे आणि विविध सामाजिक विषयांवरील पुस्तके भेट देण्यात आली. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा अन्य भेटवस्तू देण्याऐवजी पुस्तके भेट देण्याच्या उपक्रमातून वाचनाची आवड आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या जडणघडणीत वाचनाची भूमिका महत्त्वाची असून, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी पुस्तकांशी नाते जोडणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी दीपक पायगुडे यांनी या उपक्रमाबद्दल चार्मस ग्रुप संस्था, या संस्थेचे विश्वस्तांचे आभार व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या पुस्तकांचा उपयोग अभ्यासासाठी व समाजातील विविध प्रश्न समजून घेण्यासाठी होईल,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास महात्मा फुले प्रतिष्ठानच्या सचिव व शाहू फुले, आंबेडकर चळवळीतील नेत्या, सत्यशोधक अॅड.शारदा वाडेकर, चार्मस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे, श्रीधर चव्हाण, अंकल सोनवणे, विलास कसबे, विनायक राऊत, संजय पोमण आदींसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाच्या पारंपरिक शुभेच्छांना पुस्तकांची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथतुलेमुळे परिसरात वाचनसंस्कृतीचा संदेश पोहोचला.शिवाय वाढदिवसाची भेट ही वस्तूंची नव्हे, तर विचारांची असावी, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित झाला.
दरम्यान, तत्पूर्वी शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या नेत्या, सत्यशोधक अॅड. शारदा वाडेकर यांचे व्याख्यान झाले. चार्मस ग्रुपच्यावतीने दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात येते.
३६१ पुस्तकांचा ज्ञानविचारांचा ठेवा
या ग्रंथतुलेत देण्यात आलेली ३६१ पुस्तके विविध विषयांची असल्याने हा उपक्रम केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम न राहता ज्ञान आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणारा उपक्रम ठरला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या वैचारिक जडणघडणीमध्ये पुस्तकांची भूमिका महत्त्वाची असल्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
