The Zilla Parishad elections in Maharashtra are in full swing :- ... अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग लागला कामाला!
राज्यातील ३२ झेडपी आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर : येत्या ८ ऑक्टोबरला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २३ सप्टेंबर २०२५ :- ... अखेर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा (झेडपी) आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाला लागला आहे. यामुळे महाराष्ट्रात तब्बल सुमारे पावणेचार वर्षांच्या खंडानंतर यंदा या निवडणुका होणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.२३ सप्टेंबर) राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या मतदार याद्यांचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्रात आता झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. या निवडणुकीसाठी येत्या दि. ८ ऑक्टोबर २०२५ प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दि. १ जुलै २०२५ अखेरपर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या प्रारुप मतदार यादीवर गाव पुढाऱ्यांना आणि विविध राजकीय पक्षांना येत्या दि. ८ ऑक्टोबरपासून १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. या निवडणुकीसाठी दि. १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
यानुसार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. हरकती व सुचनांचे निराकरण केल्यानंतर येत्या दि. २७ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांना मुदतवाढ मिळाली आहे. तेव्हाच आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका महापालिका निवडणुकीच्या आधी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या आरक्षण सोडतीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या आव्हान याचिकाही फेटाळण्यात आल्या होत्या. या सर्व आव्हान याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आता कोणत्याही क्षणी झेडपी निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता निर्माण झाली होती. ती शक्यता आता प्रत्यक्षात आली आहे.
महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. दरम्यान, त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.
