जुन्या-जाणत्या सहकाऱ्यांना पुन्हा आपल्या गोटात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरुवात!
झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका : जालिंदर कामठे व मुरलीधर निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २४ सप्टेंबर २०२५ :- महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेते असलेले परंतु कालांतराने पक्षापासून दुरावलेल्या जुन्या जाणत्या सहकाऱ्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात परत आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
यातील पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे आणि जिल्हा भुविकास बॅंकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर हे येत्या शुक्रवारी ((दि.२६ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे दोन्ही नेते येत्या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या कामठे हे भाजपचे तर, निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांमध्ये कार्यरत आहेत.सध्या कामठे हे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष आहेत. हे दोन्ही नेते पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच असून कालांतराने ते अन्य पक्षांत गेले होते. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या घरवापसीमुळे पुरंदर आणि इंदापूर तालुक्यात पर्यायाने पुणेजिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे हे पुरंदर तालुक्यातील असून त्यांनी याआधी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि येव म्हणून काम केलेले आहे. शिवाय वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोंढवा आणि येवलेवाडी परिसरात त्यांनी मोठे काम केले आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे महापालिका निवडणुकीतही फायदा होऊ शकणार आहे.
