कोणाचा काटा काढण्याचा प्रयत्न करु नका, अन्यथा स्वतःचाच काटा निघेल, हे लक्षात ठेवा!
प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला : वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ मे २०२५ :- आपापला पक्ष किंवा संघटना मोठी करायची असेल तर, संबंधित कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचे कार्यकर्ते हे एकमेकांची उणी-धुनी काढणारे नसावेत. अन्यथा पक्षही मोठा होत नाही आणि एकमेकांचा काटा काढण्याच्या नादात स्वतःचाच काटा निघत असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रामाणिक व सकारात्मक काम करत राहिलं पाहिजे, असा सल्ला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी शनिवारी (ता.२४ मे) पुरंदर तालुक्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिला. जो कोणी कार्यकर्ता तक्रारी करतो, असा कार्यकर्ता नेत्यांना आवडत नाही. कारण नेते हे राज्याचे नेतृत्व करत असतात. त्यामुळे त्यांना सर्व माहिती असते. त्यामुळे तक्रार करत बसण्यापेक्षा किंवा निनावी पत्र पाठवून समाधान मानून तक्रार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा सरळमार्गी राजकारण करा, असा कानमंत्रही प्रा. दुर्गाडे यांनी यावेळी दिला.
हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने स्व. शिवाजीआप्पा पोमण यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आदर्श कार्यकर्ता आणि आदर्श सरपंच पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, हिवरे गावच्या सरपंच पुनम कामठे, उपसरपंच रामदास कुदळे, पुरंदर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन एम. के. गायकवाड, या पुरस्कारांचे मानकरी असलेल्या सोमुर्डी गावच्या सरपंच मंदाताई शांताराम शेंडकर, राजुरीचे माजी सरपंच उद्धव भाऊसाहेब भगत, भिवरीचे माजी सरपंच दिलीप कटके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. दुर्गाडे पुढे म्हणाले, "कार्यकर्त्यांनी डावपेच करण्यापेक्षा डावपेच न करणे, हाच खरा डावपेच असतो.पण अनेक कार्यकर्ते आयुष्यभर व झिजतात इतरांना मोठे करतात. परंतु ते स्वतः मात्र मागे राहतात. त्यांचे अक्षर:क्षा खत होऊन जाते. तेचं खत मोठया झाडाला टाकतात.त्याच जोरावर ते झाड बहरत असतं.आपण करत असलेल्या कामाचे वरिष्ठ पातळीवर मोजमाप केले जाते. ते आपल्याला अनभिज्ञ असते. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला की, घरात स्मशान शांतता असते. डोळ्यातून दुःखाश्रूने ओली झालेली उशी फक्त आपल्या बायकोला माहिती असते. पराभव झाला, त्याच्या घरासमोरच जास्त फटाके फुटले जातात, हे दुर्दैव आहे. यालाच जिरवा जिरवी म्हणतात. यात कुठे तरी बदल झाला पाहिजे. राजकारण होत असतं. पण ते करताना स्वतः साठी जगायला शिका."
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी शालेय शिक्षण मंत्री स्वर्गीय प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या संस्कारात मी आजवर कार्यरत राहिलो. संघटनेत आजवर काम करतांना अनेकांशी संबंध आला. स्वर्गीय शिवाजआप्पा सारखा संघटनेत काम करणारा कार्यकर्ता हरवला आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
जालिंदर कामठे पुढे म्हणाले, "मी अजित पवार यांना शिक्षण मंडळाची शाखा मागितली. त्यांनी सांगितले शाखा काय मागतो. त्या परिसरसतील विद्यार्थी घडावेत, यासाठी स्वतंत्र संस्था उभी कर. कॉलेजची परवानगी घे. त्यांनी मला तात्काळ जुनिअर कॉलेजची मंजुरी दिली. अजित पवार म्हणजे कामाचा माणूस. त्यांची कार्यपद्धती आवडते. कार्यकर्त्याला उत्पनाचे साधन असले पाहिजे. कार्यकर्ता हवेवर जगत नाही. ही माझी भूमिका असल्याने जेवढं शक्य तेवढं प्रयत्न करत राहतो.जेष्ठांना मदत करत राहणे, मला आवडते. ते मी माझे कर्तृत्व समजतो."
