Zp Ncp members meeting : पालकमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित झेडपी सदस्यांशी संवाद साधणार!
येत्या शुक्रवारी बोलावली पुण्यात बैठक : जिल्ह्यातील ९ तालुक्यातील सदस्य उपस्थित राहणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १२ फेब्रुवारी २०२६ :- राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी येत्या शुक्रवारी (दि. १३ फेब्रुवारी) पुणे जिल्हा परिषदेवर नव्याने निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्या पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्या या सदस्यांकडून झेडपीचे नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीबाबत सर्व सदस्यांची मते जाणून घेणार आहेत.
या बैठकीला पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, शिरूर, भोर, वेल्हे आणि हवेली तालुक्यातील सर्व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित चार तालुक्यांतील सदस्यांची स्वतंत्र बैठक बारामती येथे आयोजित केली जाणार आहे. बारामती येथील बैठकीसाठी बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्यांतील सदस्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेवर यंदा सलग पाचव्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सन २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७३ पैकी तब्बल ५२ जागांवर (यापैकी एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) विजय मिळवत पुणे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळाली आहे.'राष्ट्रवादी'च्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच या पक्षाला एवढा मोठा विजय मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, मावळ आणि वेल्हे या चार तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या आहेत. विशेष म्हणजे सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना हीच पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या सरकारी बंगल्यात झालेली आहे. स्थापनेपासून आजतागायत पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे.
