'डोक्यावर बर्फ, तोंडात खडीसाखर आणि पायाला घुंगरू बांधणारा कार्यकर्ताच आदर्श ठरू शकतो'

ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब पवार  यांचे मत : सासवड येथे बबनराव कामथे व अप्पासाहेब पुरंदरे यांना 'पुरंदरचे गुणवंत रत्न' पुरस्कार प्रदान 

'डोक्यावर बर्फ, तोंडात खडीसाखर आणि पायाला घुंगरू बांधणारा कार्यकर्ताच आदर्श ठरू शकतो'
सासवड ( ता. पुरंदर ) :-  रावसाहेब पवार यांच्या हस्ते पुरंदरचे गुणवंत म्हणून पुरस्कार स्वीकारत असताना बबनराव कामठे व आप्पासाहेब पुरंदरे  शेजारी जालींदर कामठे व अन्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १४ ऑक्टोबर २०२५ :- कोणत्याही कार्यकर्त्याला आदर्श होण्यासाठी त्यांच्या अंगी काही गुण असावे लागतात. यानुसार डोक्यावर बर्फ व तोंडात खडीसाखर आणि पायाला घुंगरू बांधणारा म्हणजेच सर्वसामान्यांच्या कामासाठी फिरणारा कार्यकर्ताच आदर्श कार्यकर्ता असतो. कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुरंदरचे गुणवंत रत्न पुरस्काराचे मानकरी  बबनराव कामथे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी सोमवारी (दि.१३ ऑक्टोबर) येथे बोलताना व्यक्त केले. जालिंदर कामठे मित्र परिवाराला अशाच गुणवंत पुरस्कारार्थींच्या माध्यमातून समाजापुढे दिशा देण्याचे काम करावयाचे आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर मित्र मंडळाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा पुरंदरचे गुणवंत रत्न या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. हे पुरस्कार रावसाहेब पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभात पंचायत समितीचे पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव कामथे आणि प्रगतशील शेतकरी अप्पासाहेब पुरंदरे या दोघांना गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह, विठ्ठल रूखमाई मूर्ती, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

यावेळी जालिंदर कामठे,भानुदास जगताप, संदीप देवकर, सचिन पठारे, महेश जगताप, दत्ता राऊत, शिवाजी साळुंखे, मनोहर कामठे, कुंडलिक मेमाणे, श्रीकांत देशपांडे, मंगल कामथे, माऊली चव्हाण, प्रीती जगताप, राजेंद्र जाधव, नवनाथ कामथे, प्रमोद जगताप, समीर कामथे, धनंजय कामथे, नानासाहेब कदम, बबन तावरे, विजय पवार, बाळासाहेब फुले, उल्हास जाधव, सुभाष धुमाळ, विकास कामथे आदी उपस्थित होते.

‌यावेळी बोलताना रावसाहेब पवार पुढे म्हणाले, "पुरंदरला आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, राजकीय असा वारसा आहे. या सानिध्यात वाढलेले अनेक लोक आपल्या आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले आहेत. अशा या थोर आणि मोठ्या लोकांचा शोध घेऊन त्यांना पुरंदरचे गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम नुकताच सुरू झाला, हे निश्चित कौतुकास्पद आहे. यानिमित्ताने तालुक्यातील गुणवंतांचा इतिहास तरुणांच्या पुढे आल्यास तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरेल."

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पुरंदरचे गुणवंत या पुरस्काराने दोन व्यक्तींना  सन्मानित करण्यात येईल. यामध्ये राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे जालींदर कामठे मित्रपरिवाराचे अध्यक्ष जालींदर कामठे यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार जगताप यांनी केले. संदीप देवकर यांनी आभार मानले.