Zilla Parishad, Panchayat samiti election:- elections in Maharashtra : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध!
राज्यातील ३२ झेडपी व ३३६ पंचायत समित्यांच्या प्रारुप मतदार याद्यांचा समावेश : येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ८ ऑक्टोबर बर २०२५ :- महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारुप मतदार याद्या बुधवारी (दि.८ ऑक्टो.) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.या याद्यांमुळे आता राज्यात खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात तब्बल सुमारे पावणेचार वर्षांच्या खंडानंतर यंदा या निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, या प्रारुप मतदार याद्यांवर गाव पुढाऱ्यांना आणि विविध राजकीय पक्षांना आता बुधवारपासून (दि. ८ ऑक्टोबर) येत्या दि. १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.२३ सप्टेंबर) ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या प्रारुप मतदार याद्यांचाही समावेश होता. जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दि.१ जुलै २०२५ अखेरपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे.
यानुसार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणनिहाय या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सुचनांचे येत्या दि.२६ ऑक्टोबरपर्यंत निराकरण केले जाणार आहे. त्यांनतर दि. २७ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.
