Guardian Minister appointment : पुणे व बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

राज्य सरकारचा आदेश जारी : माहेरच्या शेजारील जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची मिळाली जबाबदारी

Guardian Minister appointment : पुणे व बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

मुंबई/ पुणे, दि. ३ फेब्रुवारी २०२६ :- महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि मराठवाड्यातील बीड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. सुनेत्रा पवार यांचे माहेर मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील आहे. त्यामुळे त्यांना बीडच्या पालकमंत्रीपदामुळे माहेरच्या शेजारील जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (दि‌.३१ जानेवारी) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व अल्पसंख्याक विकास आदी खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. उपमुख्यमंत्री पदावरील नियुक्तीनंतर तीन दिवसांनी म्हणजेच मंगळवारी त्यांची पुणे व बीडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही दोन्ही पालकमंत्री पदे रिक्त झाली होती. नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार या एक गतिशील आणि दूरदृष्टीच्या नेत्या आहेत. त्यांनी शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन व ग्रामीण सक्षमीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. याआधीच्या म्हणजेच सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

त्यानंतर सन २०२५ मध्ये त्यांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली होती. त्या भारतातील सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक उपक्रमांमागील एक प्रेरक शक्ती म्हणून उदयास आलेल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी सन २०१० मध्ये 'एनव्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया' (EFOI) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. सध्या या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. ही संस्था पर्यावरणीय जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण-जागरूक समुदाय निर्माण करण्यासाठी काम करत आहेत.