IAS Satyajit Bade Appointment : राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तपदी सत्यजित बडे यांची नियुक्ती
येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी पदभार स्वीकारणार : दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला मिळाले नवे नेतृत्व
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ३ फेब्रुवारी २०२६ :- भारतीय प्रशासन सेवेत (आय.ए.एस.) नुकतीच निवड झालेले रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची राज्य सरकारने राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी सत्यजित बडे हे या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. बडे यांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला नवे नेतृत्व मिळाले आहे.
महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे दिव्यांग आयुक्तालय स्थापन करण्यात आलेले आहे. राज्य सरकारच्या विविध योजना व निर्णय दिव्यांगांपर्यंत पोहोचविणे ही दिव्यांग कल्याण विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. त्यामुळे विविध विभाग आणि दिव्यांगांमध्ये समन्वय साधून दिव्यांगांच्या कल्याणासाठीचे काम करण्याची जबाबदारी सत्यजित बडे यांच्यावर आली आहे.
सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत असलेले सत्यजित बडे यांची डिसेंबर २०२५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) निवड झाली आहे. विकास शाखेतून भारतीय प्रशासकीय सेवेत निवड होणारे बडे हे पुणे जिल्हा परिषदेतील दुसरे माजी अधिकारी आहेत. याआधी बडे यांनी पुणे जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुणे जिल्ह्यातील आंबेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम केलेले आहे.
सन २००० मध्ये सत्यजित बडे यांची महाराष्ट्र विकास सेवेत निवड झाली होती. तेव्हापासून आजतागायत त्यांनी विविध ठिकाणी गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी विविध पदांवर काम केले आहे. यामध्ये सन २००२ ते २००७ या कालावधीत आंबेगाव व त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. सन २०१३ ते २०१७ या कालावधीत ते पुणे जिल्हा परिषदेचे तर सन २०१७ ते २०१९ या कालावधीत सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
सत्यजित बडे यांची सन २०१९ मध्ये त्यांची विकास शाखेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात निवड झाली आणि या निवडीनंतर त्यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. सन २०२२ पर्यंत त्यांनी वर्धा जिल्हा परिषदेत काम केले. सन २०२३ पासून ते रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते.
