Mukesh Khullar, Chairman of the Sixth State Finance Commission of Maharashtra, passes away :- सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचे आकस्मिक निधन!

तीन महिन्यांपुर्वीच झाली होती नियुक्ती : मुंबईत झाले अंत्यसंस्कार 

Mukesh Khullar, Chairman of the Sixth State Finance Commission of Maharashtra, passes away :- सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचे आकस्मिक निधन!
पुणे:- मुकेश खुल्लर

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. ८ जुलै २०२५ :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतराज संस्थांचे निधी वाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेमलेल्या सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि निवृत्त सनदी अधिकारी मुकेश खुल्लर यांचे सोमवार (दि. ७ जुलै) मुंबईत आकस्मिक निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.८ जुलै) मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्य सरकारने मुकेश खुल्लर यांची दि. ३१ मे २०२५ रोजी सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती‌. त्यांनी दि. १ एप्रिल २०२५ पासून वित्त आयोगाचे कामही सुरू केले होते.त्यांना सोमवारी घरीच अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे खुल्लर हे स्वतःच गाडी चालवत मुंबई सेंट्रल येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. परंतु तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.  

मूळचे दिल्लीचे असलेल्या खुल्लर यांची सन १९८५ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत निवड झाली होती. त्यांना भंडाऱ्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पहिली नियुक्ती मिळाली होती शांत, संयमी स्वभाव, सामान्य लोकांशी संवाद साधून विषयाच्या मुळाशी जाऊन प्रश्नांची सोडवणूक करण्यात खुल्लर यांची  हातोटी होती. त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाण्याचे जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि माहिती तंत्रज्ञान, कृषी, आदिवासी विकास, ऊर्जा, सामान्य प्रशासन आदी विभागांचे सचिव म्हणून काम केले होते.  ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना राज्यातील पहिले नागरी सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्र उभारण्याची संकल्पना खुल्लर यांनी राज्यात पहिल्यांदा प्रत्यक्षात आणली. त्यांची ही कल्पना पुढे राज्यात 'सेतू सुविधा केंद्र' म्हणून खूप गाजली.

दरम्यान, राज्य व केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समतोल ठेवण्याची महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खुल्या यांची सुमारे तीनच महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली होती. त्रेहत्तराव्या घटना दुरुस्तीनंतर केंद्राच्या धर्तीवर राज्यात राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास सुरूवात झाली आहे. पहिला राज्य वित्त आयोग सन १९९४ मध्ये स्थापन करण्यात आला. यासाठी महाराष्ट्र वित्त आयोग (विविध तरतुदी) अधिनियम, १९९४ हा विधिमंडळात मंजूर करण्यात आला. या अधिनियमास तत्कालीन राज्यपालांनी दि. २२ एप्रिल १९९४  रोजी मान्यता दिली.